Latest

वायू प्रदूषणाचा झटका : कोल्हापूरकरांचे आयुर्मान तीन वर्षांनी घटले

मोहन कारंडे

कोल्हापूर; आशिष शिंदे : वाढत्या वायू प्रदूषणामुळे कोल्हापूर शहराचा समावेश देशातील सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या यादीत झाला आहे. दिवसागणिक प्रदूषणात वाढच होत असून, याचा आघात थेट शहरवासीयांच्या आरोग्यावर होत आहे. इतकेच नव्हे, तर वायू प्रदूषणामुळे कोल्हापूरकरांचे आयुर्मान सुमारे तीन वर्षांनी घटल्याचा धक्कादायक दावा शिकागो येथील एनर्जी पॉलिसी इन्स्टिट्यूटच्या अहवालात करण्यात आला आहे. राष्ट्रीय स्वच्छ वायू कार्यक्रमात कोल्हापूरचा समावेश असूनही प्रदूषणामुळे नागरिकांचे घटते आयुर्मान चिंतेचा विषय बनत आहे.

शहरातील वाढते अतिसूक्ष्म धूलिकणांचे प्रमाण (पार्टिक्युलेट मॅटर) आयुर्मान घटण्यासाठी कारणीभूत असल्याचे अहवालात सांगण्यात आले आहे. पार्टिक्युलेट मॅटर 2.5 अर्थात अतिसूक्ष्म धूलिकण हे जागतिक आरोग्य संघटनेने निश्चित केलेल्या मानकापर्यंत नियंत्रणात आणल्यास शहरवासीयांचे आयुर्मान सुधारण्यास मदत होईलच; याशिवाय धुळीमुळे होणारे अ‍ॅलर्जिक आजारांचे प्रमाणही कमी होऊ शकेल.

'ईपीआयसी'च्या अहवालानुसार, सलग चार वर्षे कोल्हापूरकरांच्या आयुर्मानात घट पाहायला मिळत आहे. 2019 च्या अहवालात आयुर्मान 2.1 वर्षांनी घटण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. त्यानंतर यात वाढच होत गेली असून, यंदा कोल्हापूरकरांचे आयुर्मान 2.97 वर्षांनी घटण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

'पार्टिक्युलेट मॅटर' सर्वात घातक प्रदूषक

हवेतील धूळ, अतिसूक्ष्म कण, जे श्वासोच्छ्वासाद्वारे शरीरात जाऊ शकतात, अशा धूलिकणांना 'पार्टिक्युलेट मॅटर' म्हटले जाते. पीएम 2.5 म्हणजे 2.5 मायक्रॉनपेक्षा कमी धूलिकण आणि पीएम 10 म्हणजे, 10 मायक्रॉनपेक्षा कमी असणारे धूलिकण. डोळ्यांना न दिसणारे हे हवेमधील धूलिकण श्वसनावाटे थेट फुफ्फुसामध्ये जाऊन रक्तात मिसळण्याचा धोका असतो. यामुळे पाटिर्र्क्युलेट मॅटरला सर्वात घातक प्रदूषक मानले जाते.

वर्ष घटत गेलेले आयुर्मान

2019 2.1 वर्षे
2020 2.4 वर्षे
2021 2.6 वर्षे
2022 2.9 वर्षे

शहरनिहाय घटलेले आयुर्मान

कोल्हापूर : 2.97
सांगली : 2.97
सोलापूर : 3.19
सातारा : 3.14
पुणे : 4.09
मुंबई शहर : 2.99
मुंबई उपनगर : 3.07

दोनप्रकारचे 'पार्टिक्युलेट मॅटर' असतात. एक पीएम 2.5 व पीएम 10. दोन्हींचे प्रमाण दाभोळकर कॉर्नर येथे वाढलेले दिसते. शिवाजी विद्यापीठ व महाद्वार रोड परिसरामध्ये हे प्रमाण नियंत्रणात आहे. येथील परिस्थिती बिघडू नये, यासाठी काळजी घेण्याची गरज आहे. याशिवाय काही ठिकाणी हेवी मेटल्सदेखील दिसून येतात.
– डॉ. पी. डी. राऊत, पर्यावरणतज्ज्ञ

 

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT