Latest

India Alliance Meeting : निवडणूक निकालांनंतर काँग्रेसला इंडिया आघाडीची आठवण, ६ डिसेंबरला बोलावली बैठक 

backup backup
नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील निवडणूक निकालांमध्ये काँग्रेसला अनपेक्षित निकाल लागला आहे. यानंतर काँग्रेसने ६ डिसेंबरला दिल्ली येथे इंडिया आघाडीची बैठक बोलावली आहे. दरम्यान चार राज्यांचे निकाल लागल्यानंतर इंडिया आघाडीतील घटक पक्ष असलेले शिवसेना (ठाकरे गट) आणि जनता दल युनायटेडच्या वतीने काँग्रेसला घरचा आहेर देण्यात आला आहे.
काही महिन्यांपुर्वी कर्नाटक जिंकल्यानंतर छत्तीसगड, मध्य प्रदेश, तेलंगणा आणि राजस्थानमध्ये सरकार बनवण्यासाठी काँग्रेसचे प्रयत्न होते. मात्र काँग्रेसला यात यश आले नाही. तेलंगणा वगळता अन्य तीनही राज्य भाजपने जिंकले. निवडणुकीपूर्वी पाचही राज्यांच्या निवडणुका झाल्यानंतर इंडिया आघाडीतील घटक पक्षांची बैठक बोलावून लोकसभेतील जागा वाटपाबद्दल चर्चा होईल, अशा बातम्या होत्या. दरम्यान, विविध राज्यांमध्ये काँग्रेसला चांगल्या जागा मिळवल्यास लोकसभेत जागा वाटपात काँग्रेसचे भाव वधारण्याची शक्यता होती. आता या शक्यतेचे काय होणार हेही लवकरच स्पष्ट होणार आहे. दरम्यान, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी सहा डिसेंबरला इंडिया आघाडीची बैठक नवी दिल्लीत बोलवली आहे.
चार राज्यांच्या निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या प्रियंका चतुर्वेदी यांनी काँग्रेसने आत्मपरीक्षण करावे, असा सल्ला दिला आहे. काही ठिकाणी काँग्रेस आणि समाजवादी पक्ष यांच्यातही सामना होता. तो काँग्रेसला टाळता आला असता. काँग्रेस मोठा पक्ष आहे, असेही त्या म्हणाल्या. तसेच जनता दलाचे पदाधिकारी निखिल मंडल यांनी एक्सवर लिहीले की, इंडिया आघाडीला आता नितीश कुमार यांच्या द्वारे चालवले पाहिजे. काँग्रेस पक्ष पाच राज्यांच्या निवडणुकीत व्यस्त असल्याने इंडिया आघाडीकडे लक्ष देऊ शकत नव्हता. काँग्रेसने निवडणूकही लढली आहे आणि निकालही समोर आले आहेत. नितीश कुमार हेच इंडिया आघाडीचे सूत्रधार आहेत आणि तेच इंडिया आघाडीला पुढे नेऊ शकतात. त्यामुळे इंडिया आघाडीतील घटक पक्षांच्या या प्रतिक्रिया पाहता इंडिया आघाडीतील घटक पक्षांनी काँग्रेसला घरचा आहेर दिला, अशा चर्चा राजकीय वर्तुळात आहेत.
चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर इंडिया आघाडीच्या बैठकीत काय होणार, जगावाटपावर चर्चा होणार का किंवा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरणार का, असे अनेक प्रश्न आहेत. काही दिवसांपूर्वी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी काँग्रेसवर भाष्य केले होते. त्यानंतर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी नितीश कुमार यांच्याशी फोनवरून बातचीतही केली होती.
हेही वाचा
SCROLL FOR NEXT