Latest

सचिनच्या कौतुकावर पाकिस्तानच्या माजी खेळाडूने दिली प्रतिक्रिया, म्‍हणाला….

मोहन कारंडे

पुढारी ऑनलाईन डेस्क : पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू अब्दुल रज्जाक याला सचिन तेंडुलकर त्याच्या कारकिर्दीतील सर्वात धोकादायक गोलंदाज मानायचा. रज्जाकचे चेंडू खेळणे त्याच्यासाठी नेहमीच आव्हानात्मक राहिले असल्याचे सचिनने अनेकदा सांगितले आहे. अलीकडेच एका मुलाखतीत सचिनने पुन्हा एकदा रज्जाकचा सामना करणे कठीण होते, असे सांगत त्याचे कौतुक केले. सचिनच्या या स्तुतीवर रज्जाकने प्रतिक्रिया दिली आहे.

अब्दुल रज्जाक हा असा गोलंदाज आहे जो सचिन तेंडुलकरला सातत्याने बाद करू शकला. रज्जाक सचिनची विकेट घेण्यात नेहमीच यशस्वी ठरला. सचिनने एका मुलाखतीत रज्जाकला खेळणे कठीण होते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ज्या कठीण गोलंदाजांचा सामना केला त्यापैकी तो एक होता, असे म्हटले आहे.

हा तर सचिनचा माेठेपणा

तेंडुलकरच्या कौतुकावर प्रतिक्रिया देताना रज्जाक म्हणाला की, "सचिनचा मोठेपण आहे की, त्याने माझे नाव घेतले. सचिन हा जागतिक दर्जाचा फलंदाज होता आणि कायम राहील. सचिन कोणाचेही नाव घेवू शकला असता; पण त्याने माझे नाव घेतले. त्याने माझे नाव का घेतले माहित नाही. मॅक्ग्रा, अक्रम, एम्ब्रोस, वॉल्श, मुरलीधरन सारखे दिग्गज गोलंदाज होते, तरीही त्याने माझं नाव घेतले हा त्याचा मोठेपणा आहे,"

ऑस्ट्रेलियात खेळल्या गेलेल्या तिरंगी मालिकेची आठवण सांगताना रज्जाक म्हणाला, "जेव्हा चेंडू स्विंग होतो, तेव्हा सर्वात मोठा फलंदाजही अस्वस्थ होतो. सचिन भारतासाठी वन-मॅन आर्मी होता. जेव्हाही आम्ही भारताविरुद्ध खेळलो तेव्हा वरिष्ठांनी नेहमी सचिनची विकेट घेण्यास सांगितले. ऑस्ट्रेलियातील मालिकेदरम्यान मी त्याला आऊट केले होते."

2006 मध्ये क्लीन बोल्ड केले

अब्दुल रज्जाक हा पाकिस्तानमधील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंपैकी एक होता. रज्जाकने 2000 ते 2006 पर्यंत सचिनला 6 वेळा बाद केले. 2006 मध्ये भारतीय संघ पाकिस्तान दौऱ्यावर गेला असताना रज्जाकने सचिनला क्लीन बोल्ड केले होते.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT