Latest

AFG vs ENG : वर्ल्ड कपमध्‍ये मोठा उलटफेर! अफगाणिस्‍तानने उडवला इंग्‍लंडचा धुव्‍वा

Shambhuraj Pachindre

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : दुबळ्या संघाने बलाढ्य संघाचा पराभव करण्‍याची वन-डे वर्ल्ड कप स्‍पर्धेतील परंपरा यंदाही कायम राहिली. गतविजेता इंग्‍लंडचा आज (दि.१५) नवख्‍या अफगाणिस्‍तानने ६९ धावांनी पराभव करत संपूर्ण क्रिकेटविश्‍वाला चकीत केले. वन-डे वर्ल्ड कप स्‍पर्धेतील त्यांचा हा पहिलाच विजय आहे. (AFG vs ENG)

सामन्यात इंग्‍लंडने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानने सर्वबाद २८४ धावा केल्या. यामध्ये सलामीवीर गुरबाजने सर्वाधिक ८० धावा केल्या. तर इक्रामने ५८ धावांची खेळी केली. गोलंदाजीमध्ये इंग्लंडच्या आदिल राशिदने सर्वाधिक ३ विकेट घेतल्या. त्याच्यासह मार्क वूडने २ तर जो रूट, लिव्हिंगस्टोन आणि टोप्लेने प्रत्येकी १ विकेट घेतली. अफगाणिस्तानविरूद्धच्या सामन्यात विजय मिळण्यासाठी इंग्लंडला २८५ धावांचे लक्ष्य आहे. (ENG vs AFG)

अफगाणिस्तानने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना गतविजेत्या इंग्लंडचा डाव २१५ धावांवर गुंडाळला. या आव्हानाचा पाठलाग करताना अफगाणिस्तानच्या फिरकी समोर इंग्लंडच्या फलंदाजांनी लोटांगण घातले. इंग्लंडकडून हॅरी ब्रुकने सर्वाधिक ६६ धावांची खेळी केली. त्याच्यासह डेव्हिड मलानने ३२ धावांची खेळी केली. यांच्या व्यतिरिक्त इंग्लंच्या इतर खेळाडूंनी फलंदाजीमध्ये निराशा केली.

अफगाणी फिरकीसमोर इंग्लंडचे लोटांगण

अफगाणिस्तानच्या फिरकी गोलंदाजांनी चमकदार कामगिरी केली. अनुभवी रशीद खान आणि मुजीब उर रहमान यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले. त्याचवेळी ऑफस्पिनर मोहम्मद नबीने दोन विकेट्स आपल्या नावावर केल्या. रशीद, मुजीब आणि नबी यांनी मिळून इंग्लंडचे कंबरडे मोडले. फजलहक फारुकी आणि नवीन उल हक यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

हॅरी ब्रूकच्या सर्वाधिक धावा

इंग्लंडकडून हॅरी ब्रूकने सर्वाधिक ६६ धावा केल्या. तो वगळता एकाही फलंदाजाला मोठी खेळी खेळता आली नाही. डेव्हिड मलानने ३२, आदिल रशीदने २० मार्क वुडने १८, रीस टोपलीने नाबाद १५ आणि जो रूटने ११ धावा केल्या. लियाम लिव्हिंगस्टोन आणि सॅम कुरन यांनी प्रत्येकी १० धावा केल्या. कर्णधार जोस बटलर आणि ख्रिस वोक्स यांनी प्रत्येकी नऊ धावा केल्या. तर, सलामीवीर जॉनी बेअरस्टो दोन धावा करून बाद झाला.

भारतात इंग्लंडविरूद्ध दुसऱ्यांदा उलटफेर

इंग्लंडचा १२ वर्षात दुसऱ्यांदा भारतामध्ये होणाऱ्या वर्ल्डकपमध्ये उलटफेर झाला आहे. २०११ साली भारतात झालेल्या वर्ल्डकपमध्ये दुबळ्या आयर्लंडने बंगळुरूमध्ये इंग्लंडचा पराभव केला होता. यानंतर वन-डे वर्ल्डकप २०२३ मध्ये आज (१०) दिल्लीच्या अरूण जेटली स्टेडियमवर झालेल्या सामन्यात अफगाणिस्तानने  बलाढ्य इंग्लंडचा डाव २१५ गुंडाळत पुन्हा एकदा उलटफेर केला आहे.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT