Latest

आदित्य ठाकरे मर्यादा पाळा, मी बोललो तर तुम्हाला महाग पडेल! मंत्री केसरकरांचा इशारा

Shambhuraj Pachindre

सावंतवाडी; पुढारी वृत्तसेवा : माझ्या मतदार संघात येवून माझ्यावर बोलणारे आदित्य ठाकरे माझ्यापेक्षा खुप लहान आहेत. त्यामुळे त्यांनी विरोधात बोलताना मर्यादा पाळाव्यात, मी त्यांच्या मतदार संघात जावून बोललो तर त्यांना परवडणार नाही, असा इशारा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आदित्य ठाकरे यांना दिला.

दरम्यान महिला विधेयक मंजूर झाले असले तरी कोणाचे नुकसान होणार नाही. सभागृहातील काही जागा वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे महिलांची संख्या वाढली तरी ज्या चांगल्या व्यक्ती आहेत त्यांना निश्चितच स्थान मिळणार आहे, असे त्यांनी सांगितले.

उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी काल (दि.२१) सावंतवाडीत मंत्री केसरकर यांच्यावर टीका केली होती. त्यांच्या बद्दल काय बोलणार ते खोके सरकार मधील आहेत, असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला होता. याबाबत मंत्री केसरकर यांना छेडले असता ते म्हणाले, या ठिकाणी माझ्याच मतदार संघात येवून आदित्य ठाकरे माझ्या विरोधात बोलत असतील तर ते मी सहन करणार नाही. ते माझ्या पेक्षा लहान आहेत. त्यामुळे त्यांनी माझ्या विरोधात बोलताना मर्यादा सांभाळल्या पाहिजेत.

आजपर्यंत मी ठाकरे कुटुंबियांच्या विरोधात बोललो नाही. त्यांनी तशीच टीका सुरू ठेवली तर मी त्यांच्या मतदार संघात जावून त्याच्या विरोधात अनेक काही गोष्टी बोलू शकतो. मात्र त्यावेळी ते ठाकरेंना परवडणार नाही. असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

यावेळी महिला विधेयकाच्या बाबत त्यांना विचारले असता मंत्री केसरकर म्हणाले. या विधेयकामुळे नारी शक्तीचा खर्‍या अर्थाने विजय झाला आहे. विधेयक मंजूर झाल्याने याचा फायदा आता महिलांना होणार आहे. मात्र सद्यस्थिती लक्षात घेता विरोधकांनी एकीकडे श्रेय घेण्यास सुरवात केली आहे. तर, दुसरीकडे जागा कमी होणार आहे. अशी ओरड सुरू केली आहे. मात्र, निर्णयामुळे जागा वाढणार आहे. त्यामुळे ज्यांनी सभागृहात चांगले काम केले आहे. त्यांना निश्चितच पुन्हा सभागृहात येण्याची संधी मिळणार आहे, असे केसरकर यांनी सांगितले.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT