Latest

Adhik Maas 2023 | यंदा तब्बल १९ वर्षांनी आलाय अधिक श्रावण, जाणून घ्या याचे महत्व

backup backup

पुढारी ऑनलाईन : दर तीन वर्षांत एकदा कोणता तरी महिना अधिक मास येतो, हे आपणास माहिती आहे. त्यामध्ये सुद्धा सामान्यतः 27 ते 35 महिन्यांत अधिक मास येतो आणि दर 19 वर्षांनी पुन्हा तोच महिना अधिक मास येतो, असा एक साधारण नियमही अनेकांना माहिती आहे. यापूर्वी सन 2004 यावर्षी अधिक श्रावण महिना आलेला होता. त्यानंतर शके 1964 मध्ये 17 जुलै 2042 ते 15 ऑगस्ट 2042 या कालावधीत अधिक श्रावण मास आहे. मात्र यानंतरचा अधिक महिना हा ज्येष्ठ असणार असून शके 1948 मध्ये 17 मे 2026 ते 15 जून 2026 दरम्यान हा अधिक ज्येष्ठ येईल. पंचांगकर्ते ओंकार मोहन दाते (सोलापूर) यांनी याबाबत माहिती दिली आहे. (Adhik Maas 2023)

चैत्र, वैशाख, ज्येष्ठ याप्रमाणे 12 चांद्र महिने आहेत. एका अमावास्येपासून दुसर्‍या अमावास्येपर्यंत एक चांद्र महिना असतो. मीन राशीत सूर्य असताना ज्या चांद्र मासाचा आरंभ होतो त्यास 'चैत्र मास' म्हणतात. मेष राशीत सूर्य असताना ज्या चांद्र मासाचा आरंभ होतो त्यास 'वैशाख मास' म्हणतात. याप्रमाणे अनुक्रमाने पुढील चांद्र मास होत जातात. प्रत्येक चांद्र महिन्यात सूर्याचे राशी संक्रमण झाले, तर तो नेहमीचा चांद्र मास असतो. परंतु ज्या चांद्र मासात सूर्याचे राशी संक्रमण होत नाही त्या महिन्यास 'अधिक मास' म्हणतात. यामध्ये सुद्धा चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, आश्‍विन व फाल्गुन हे अधिक मास होऊ शकतात.

सौरवर्ष 365 दिवसांचे असते, तर चांद्रवर्ष हे 354 दिवसांचे असते. म्हणजे चांद्रवर्ष हे 11 दिवसांनी कमी असते. सुमारे तीन वर्षांतून एकदा अधिक मास आला की सौरवर्ष व चांद्रवर्ष यांची सांगड घातली जाते आणि ऋतुचक्राशीसुद्धा जमवून घेतले जाते. सूर्य व चंद्र यावरच मुख्यत: सृष्टीची स्थिती अवलंबून आहे. प्रत्येक चांद्र मासात सूर्याचे राशी संक्रमण झाले तरच त्या महिन्यास शुचित्व प्राप्त होते. म्हणून सूर्य संक्रमण न झाल्यामुळे होणार्‍या मासास अधिक मास, मल मास, धोंडा मास, असेही म्हणतात.

मल म्हणजे अशुद्ध अशा अधिक मासात नेहमीची व्रतवैकल्ये करता येत नाहीत. प्रत्येक महिन्याची एक-एक देवता सांगितली आहे. त्याप्रमाणे या अधिक मासाची देवता भगवान श्रीकृष्ण असल्याने या अधिक मासास 'पुरुषोत्तम मास', असेही म्हटले आहे. या अधिक मासात श्री पुरुषोत्तमप्रित्यर्थ महिनाभर उपोषण, अयाचित म्हणजे भोजन करतेवेळी न मागता मिळेल तेवढेच खाणे. 'एक भुक्त' म्हणजे माध्यान्ही एक वेळ भोजन करणे, 'नक्त भोजन' म्हणजे दिवसा उपोषण करुन रात्री भोजन करणे, 'मौन भोजन' म्हणजे भोजनावेळी मौनव्रत धारण करणे, याप्रमाणे व्रते करावीत. अशक्ताने (ज्यांना महिनाभर शक्य नाही त्याने) वरीलपैकी एक प्रकार निदान तीन दिवस अगर एक दिवस तरी आचरणात आणावा. त्याचप्रमाणे महिनाभर तांबूल दान दिल्यास सौभाग्यप्राप्ती, देवापुढे अखंड दीप लावल्यास लक्ष्मीप्राप्ती, निदान एक दिवस गंगास्नान केल्यास सर्व पापनिवृत्ती होते. या महिन्याची देवता पुरुषोत्तम असल्याने श्री विष्णूयाग, श्री सत्यनारायण पूजा करता येईल.

व्रत व दान

या महिन्यात शुक्ल व कृष्ण द्वादशी, पौर्णिमा, कृष्ण अष्टमी, नवमी, चतुर्दशी व अमावास्या या तिथीस आणि व्यतिपात व वैधृति असेल त्यादिवशी अपूपदान (अनारसे दान) करावे. यादिवशी शक्य नसेल तर या महिन्यात कोणत्याही दिवशी तेहतीस अपूपदान करावे. ज्यांना अपूपदान देणे शक्य नसेल त्यांनी तेहत्तीस बत्ताशांचे दान द्यावे. अशाप्रकारे व्रत व दान करुन आयुष्य, आरोग्य, ऐश्‍वर्य व पुण्य मिळवावे, हा यामागील हेतू आहे. या अधिक मासात नित्य व नैमित्तिक कर्मे करावीत. काम्य कर्मांचा आरंभ व समाप्ती करू नये. जे केल्यावाचून गती नाही, अशी कर्मे करावीत. देवतांच्या मूर्तीची पुन्हा प्राणप्रतिष्ठा करता येते. ग्रहण, श्राद्ध, जातकर्म, नामकर्म हे संस्कार करावेत. तीर्थश्राद्ध, दर्शश्राद्ध, नित्यश्राद्ध करावीत. गृहारंभ, वास्तुशांती, संन्यास ग्रहण, नूतन व्रत ग्रहण, विवाह, उपनयन, चौल, नवीन देव प्रतिष्ठा करू नये. मात्र साखरपुडा, बारसे, डोहाळ जेवण, जावळ, लौकिक गृहप्रवेश, नवीन वाहन-वास्तू खरेदी, नवीन व्यवसाय सुरू करणे आदी गोष्टी करता येतात. मकर संक्रांतीप्रमाणे अधिक मासाच्यावेळीसुद्धा हा अधिक मास चांगला नाही. त्यामुळे या अधिक मासात वाण, दान, अन्नदान आदी करू नये तसेच हा अधिक मास जावयाला किंवा सुनेला वाईट आहे, अशाप्रकारच्या अफवा पसरविल्या जातात. त्यावर विश्‍वास ठेऊ नये. (Adhik Maas 2023)

अधिक मास व श्राद्ध

मागील वर्षी श्रावण महिन्यात ज्यांचा मृत्यू झाला असेल त्यांचे प्रथम वर्षश्राद्ध अधिक श्रावण मासात त्या तिथीस करावे. यापूर्वीच्या अधिक श्रावण मासात ज्यांचा मृत्यू झालेला असेल त्यांचे दरवर्षाचे श्राद्ध अधिक श्रावणातच करावे. मात्र दरवर्षाच्या श्रावण मासात ज्यांचे श्राद्ध असेल त्यांचे प्रतिसांवत्सरिक श्राद्ध यावर्षी निज श्रावण मासात त्या तिथीस करावे. यावर्षी श्रावण अधिक असल्याने श्रावण मासात केली जाणारी सर्व वारव्रते जसे की, श्रावणी सोमवार, मंगळागौर, वरदलक्ष्मीव्रत इ. निज मासात म्हणजेच 17 ऑगस्ट 2023 ते 15 सप्टेंबर 2023 याकालावधीत करावीत, अधिक मासात करू नयेत. त्यामुळे पहिला श्रावणी शुक्रवार, 18 ऑगस्ट रोजी तर पहिला श्रावणी सोमवार, 21 ऑगस्ट रोजी आहे.

 हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.