– डॉ. लीला पाटील
मानवी आयुष्याशी निगडीत बरेच प्रश्न असतात. त्या प्रश्नांचे उत्तर परस्पर मिळावे म्हणून देवादिकांच्या कहाण्या किंवा लोककथा सांगितल्या जातात. फार पूर्वी लोकांना लेखन वाचन शक्य नसे. त्यामुळे देवळात, राऊळात जाऊन ज्ञानी माणसांच्या तोंडून कृपा ऐकल्या जात. त्याकाळी करमणुकीची साधनेही फार नव्हती. त्यामुळे कीर्तन प्रबोधन आणि प्रबोधनासाठी देवकथा किंवा लोककथांचा वापर उपदेशासाठी, चांगल्या वर्तणुकीसाठी केला जात असे.
दुसरे म्हणजे आषाढ ते मार्गशीर्ष म्हणजे श्रावणातसुद्धा रोग पसरवणार्या जीवजंतूंची वाढ करणारा काळ म्हटले जाते. या काळात खाण्यावर नियंत्रण असावे. म्हणून उपवास सुचवले आहेत. हवामानही प्रतिकूल असते. असुरी प्रवृत्ती वाढते. त्यावर नियंत्रण करण्याकरिता शास्त्रकारांनी देवकथांतून अक्षरशः लोकजागर घडवला आणि मानवी जीवन देवजीवनाशी एकरूप करण्यासाठी त्यांनी श्रावण मासास पुण्यप्रद मानले.
व्रतवैकल्य उपवास, पूजापाठ यामुळे संयम निर्माण होतो. माणूस समजूतदार बनतो. समाज बांधील होतो. समाज जीवनात एकरुपता येते. परदुःख आपले मानू लागतो आणि दुःखाच्या परिहारासाठी माणूस देवांप्रत जाऊ लागतो. मन विषयांपासून, स्वार्थापासून परावृत्त होते. बुद्धीचा विकास होतो. भक्ती श्रद्धा व पूजापाठ यासारख्या धार्मिक बाबींच्या आत्मसातीकारणामुळे माणसाचे मन समाधानी बनू शकते.
श्रावण महिन्यासह असलेल्या सण (चातुर्मासातही) व्रतवैकल्ये, धार्मिक विधी, यज्ञ, पूजा-पाठ यासह उत्सवाचे आयोजन केले जाते. श्रावण शुद्र पौर्णिमा म्हणजे श्रावणी. यज्ञोपवित धारण करावयाच्या विधीला श्रावणी म्हटले जाते. श्रावण नक्षत्रावर हा विधी केला जातो. मुंज केल्याशिवाय वेदाध्ययन करण्याचा अधिकार लाभत नाही. म्हणून मुंज होणे वा करणे आवश्यक असते. पहिला जन्म आईच्या पोटी व दुसरा जन्म आचार्यांनी केलेल्या संस्कारामुळे व गायत्री मातेच्या मंत्रजपामुळे प्राप्त होतो म्हणून द्विज म्हटले जाते.
मुंज म्हणजे उपनयन संस्कार. उपनयन संस्कारात यज्ञोपवित (जानवे) धारण करणे आणि गायत्री मंत्राचा उपदेश घेणे ही दोन प्रमुख कर्मे आहेत. ही प्राचीन कालपासून चालत आलेला संस्कार, परंपरा आहे. उपनयन अर्थात मुंज झालेल्या सर्व व्यक्ती वरील विधीकरीत एकत्र येतात. करंगळीजवळच्या बोटात या व्यक्तींनी पवित्रक घालायचे असते. शरीरशुद्धीसाठी त्या व्यक्ती पंचगव्य म्हणजे दूध, दही, तूप, शेण व गोमूत्र यांचे प्राशन करतात. त्यानंतर गुरुजी गणेशप्राशन व होम करतात. यावेळी 'वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरू मे देवं सर्व कार्यषु सर्वदा' आदी मंत्रोच्चार केले जातात. त्यानंतर शिजलेल्या एकवीस आहुती भाताच्या होमात अर्पण करतात. नंतर 'ब्रह्मयज्ञ' करतात. गायत्री मंत्राचा जप करावयाचा आणि यज्ञोपवित (श्रावणी) धारण करायचे असते. जानवे धारण करण्याचा हा विधी श्रावण महिन्यात केला जातो.
श्रावण महिन्यात श्रावण वद्य अष्टमीची रात्र नजरेसमोर उभी राहते. मध्यरात्री श्रीकृष्णाचा जन्मोत्सव साजरा केला जातो. भाविक संपूर्ण दिवस उपवास करतात. गोकुळ अष्टमिची रात्र. डोळ्यात बोट घातले तरी दिसू नये असा अंधार. पाऊस कोसळतो आहे. यमुनेला महापूर आला आहे व अशावेळी नुकतेच जन्मलेल्या बाळाला टोपलीत घेऊन एक गृहस्थ नदीच्या पुरातून हळूहळू चालला आहे. हे दृश्य कृष्णजन्माची लोकविलक्षण हकिकत सांगणारे, नजरेसमोर प्रकट होऊ लागले. होय, भगवान श्रीकृष्णाचा जन्म तुरुंगात या पावसाळी दिवसातल्या अष्टमीस झाला. ह्या सणाचा महिमा लहानसहान थोडाच? कृष्णजन्मोत्सव आपल्या इकडे कृष्णदेवळातून होतो. कोकणात त्यावेळी दहिकाला करण्याची पद्धत आहे. लोकनृत्य करतात व दह्याची हंडी घरोघर जाऊन फोडतात, त्याला दहीहंडी म्हणतात.
गोकुळ, मथुरा, वृंदावन, पुरी, द्वारका ही श्रीकृष्णाची प्रख्यात मंदिरे असलेली गावे. तेथे देवाची पालखी निघते. दीपोत्सव होतो. भागवताचे संकीर्तन होते. कृष्णलीलेचेही खेळ होतात. श्रीकृष्णाच्या आयुष्यावरची नाट्यगीतेही सादर केली जातात. श्रीकृष्णाचे चरित्र रामाहून वेगळे? पण तोही एक आदर्श पुरुष होऊ गेला. व्यवहारचतुर, राजकारणी लोकप्रिय व अत्यंत लोभस व्यक्तिमत्वाचा कृष्णदेव. त्याचे अवतार कार्य दुष्ट संहाराचे. ते या दिवशी आठवावे असे तोलामोलाचे.
श्रीविष्णुने धर्म व न्याय यांच्या रक्षणासाठी श्रीकृष्णाच्या रूपाने घेतलेला जन्म दिवस म्हणजे 'गोकुळाष्टमी' होय. श्रीकृष्णाने मात्यापित्याला बंदिवासातून मुक्त करून कपटी कंसाला ठार मारले तसेच शिशुपाल व जरासंधाचाही वध त्याने केला. कौरव-पांडव महायुद्धात युधिष्टराला धीर देत रथाचे सारथ्य करीत पांडवांना विजय मिळवून दिला. सत्य व न्याय बाजूची कास धरणारा श्रीकृष्ण. दुष्टांचा संहार व धर्मस्थापनेचा हेतू हा कृष्णाच्या अवताराचे फलित होते.
श्रीकृष्णाच्या जन्मोत्सवाच्या दुसर्या दिवशी म्हणजे श्रावण वद्य नवमीस दहीकाला असतो व दहीहंडी फोडली जाते. सर्वदूर सर्वत्र हा दहीहंडीचा कार्यक्रम उत्साहात साजरा होतो.
श्रावण महिन्यात पिठोरी अमावस्या साजरी केली जाते. हे व्रत आहे. ते सुवासिनी स्त्रिया करतात. दिवसभर उपवास करून संध्याकाळी स्नान करतात. घरातील मुलास किंवा मुलीस खीरपुरीचे वायन दिले जाते. तसेच चौसष्ट योगिनींचे चित्र असलेल्या कागदाची पूजा करतात. पुरणपोळी खांद्यावरून मागे नेत "अतिथी कोण आहे?" असा प्रश्न विचारतात. त्यावेळी मुलाचे नाव घेऊन प्रश्नाचे उत्तर देतात. हे व्रत केल्यामुळे दीर्घयुषी पूत्र व अखंड सौभाग्य लाभ ते असे मानले जाते.
श्रावण मासात नागपंचमी, मंगळागौरी, रक्षाबंधन व नारळी पौर्णिमा, उपनयन संस्कार कृष्णाष्टमी पिठोरी अमावस्या, सोमवारचा उपवास अशासारखे सण व व्रतवैकल्ये साजरी होतात. यात धार्मिक विधीला महत्त्वाचे स्थान आहे. पूजापाठ, किर्तन, प्रवचन, भजन, भक्तीगीते, पोथी पुराण, ग्रंथ वाचन, फलाहार, मांसाहार वर्ज्य अशासारख्या बाबींवर भर देणे घडते. पवित्रता व मांगल्य याचेच वातावरण असणारा श्रावण मास ऊन पाऊसाच्या रिमझिमने धरतीला हिरव्यांचेच दान देऊन पानफुले वृक्ष वेली यांना बहर आणून मनोहरी दृश्य देऊन नेत्रांना सुखावणारा!