गुडाळ; पुढारी वृत्तसेवा रविवारी पहाटे पुणे- बेंगलोर महामार्गावर नऱ्हे आंबेगाव नजीक खाजगी बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. यामध्ये दाजीपूर (ता. राधानगरी) येथील माय – लेकराचा जागीच मृत्यू झाला.
रवींद्र वासुदेव कोरगांवकर (वय 47) आणि श्रीमती सुवर्णा वासुदेव कोरगांवकर (वय 85) अशी या दुर्दैवी मायलेकरांची नावे आहेत. ते दाजीपूरचे माजी सरपंच कै. वासुदेव कोरगांवकर यांची पत्नी आणि सुपुत्र आहेत.
रवींद्र कोरगांवकर हे पोस्ट खात्यात नोकरीस असून, गेल्याच वर्षी त्यांची सिंधुदुर्ग मधून मुंबई येथे बदली झाली होती. पत्नी आणि दोन मुलींसह ते मुंबईत राहत होते. नुकताच त्यांनी मुंबईत नवीन फ्लॅट घेतला आहे. आपल्या आईला फ्लॅट दाखविण्यासाठी दाजीपुरहून ते मुंबईला घेऊन निघाले होते.
शनिवारी रात्री ते कोल्हापूरहून खाजगी बसने मुंबईला चालले होते. रविवारी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास नऱ्हे आंबेगाव नजीक बसला पाठीमागून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. या धडकेत चार प्रवासी जागीच ठार झाले. त्यामध्ये दुर्देवाने स्लिपर कोच बस मध्ये मागच्या बाजूस झोपलेल्या कोरगांवकर माय लेकरांचा झोपेतच बळी गेला.
रविवारी सकाळी या अपघाताचे वृत्त समजताच रवींद्र यांचे चुलत बंधू आणि कोल्हापूर बाजार समितीचे माजी संचालक सदानंद कोरगांवकर नातेवाईकांसह पुण्याला रवाना झाले. या दुर्घटनेचे वृत्त समजताच दाजीपूर येथे शोककळा पसरली. सहा महिन्यांपूर्वीच माजी सरपंच वासुदेव कोरगांवकर यांचेही निधन झाले होते. रविवारी रात्री दाजीपूर येथील स्मशानभूमीत कोरगांवकर माय- लेकरावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
हेही वाचा :