Latest

AB de Villiers : डिव्हिलियर्सचा क्रिकेटला अलविदा ! त्याच्या मराठी शब्दातील पोस्टने चाहते भारावले

backup backup

दक्षिण आफ्रिकेचा महान क्रिकेटपटू एबी डिव्हिलियर्सने (AB de Villiers) क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. एबीने आधीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती, पण आता तो आयपीएलसारख्या लीगमध्ये भाग घेणार नाही. डिव्हिलियर्स आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोरकडून खेळत होता.

एबी डिव्हिलियर्सने (AB de Villiers) ट्विट केले की, 'हा एक अविश्वसनीय प्रवास होता, परंतु मी सर्व क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. माझ्या घरामागील अंगणात माझ्या मोठ्या भावांसोबत क्रिकेट खेळायला लागल्यापासून मी हा खेळ पूर्ण आनंदाने आणि निर्भयपणे खेळलो आहे. आता वयाच्या ३७ व्या वर्षी ती ज्योत तितक्या वेगाने जळत नाही.

क्रिकेट माझ्यावर अत्यंत दयाळू राहिलं आहे

डिव्हिलियर्सने (AB de Villiers) लिहिले की, 'क्रिकेट माझ्यावर अत्यंत दयाळू राहिलं आहे. टायटन्स असो वा प्रोटीज किंवा आरसीबी, या खेळाने मला अकल्पनीय अनुभव आणि संधी दिल्या आहेत. यासाठी मी सदैव ऋणी राहीन. मी संघातील सहकारी, विरोधक, प्रशिक्षक, फिजिओ आणि प्रत्येक सपोर्ट सदस्याचे आभार मानू इच्छितो ज्यांनी त्याच मार्गावर प्रवास केला.

त्याने पुढे लिहिले की, 'दक्षिण आफ्रिकेत, भारतात आणि मी जिथे जिथे खेळलो तिथे मला मिळालेला पाठिंबा पाहून मी भारावून गेलो आहे. शेवटी मला माहित आहे की माझे कुटुंब आईवडील, माझा भाऊ, माझी पत्नी डॅनियल आणि माझ्या मुलांचा त्याग केल्याशिवाय काहीही शक्य झाले नसते. मी माझ्या आयुष्याच्या पुढील अध्यायाची वाट पाहत आहे जेव्हा मी त्याला खरोखर प्रथम स्थानावर ठेवू शकेन.

त्याने ट्विटरवर पोस्ट करताना चाहत्यांचे आभार मानताना धन्यवाद हा शब्दही लिहिला आहे. यावरून त्याचे भारतीयांवरील प्रेम दिसून येते.

३७ वर्षीय एबी डिव्हिलियर्स हा आयपीएलमधील सर्वात यशस्वी फलंदाजांपैकी एक आहे. एबीने 184 आयपीएल सामन्यांमध्ये 39.70 च्या सरासरीने 5162 धावा केल्या ज्यात तीन शतके आणि 40 अर्धशतकांचा समावेश आहे. IPL-14 च्या पहिल्या टप्प्यात डिव्हिलियर्सची बॅट जोरदार बोलली. यादरम्यान डिव्हिलियर्सने सात सामन्यांत 51.75 च्या उत्कृष्ट सरासरीने एकूण 207 धावा केल्या. मात्र, दुसऱ्या टप्प्यात त्याची बॅट शांत राहिली. आरसीबी व्यतिरिक्त, एबीने आयपीएलमध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्सचे प्रतिनिधित्व केले आहे.

… डिव्हिलियर्सची आंतरराष्ट्रीय कारकीर्द

एबी डिव्हिलियर्सने (AB de Villiers) 2018 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला होता. सध्याच्या काळातील महान फलंदाजांमध्ये डिव्हिलियर्सची गणना केली जाते. तो दक्षिण आफ्रिकेचा कर्णधारही राहिला आहे. त्याने आपल्या देशासाठी 114 कसोटी सामन्यांच्या 91 डावांमध्ये 50.66 च्या सरासरीने 8765 धावा केल्या ज्यात 22 शतके आणि 46 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याची कसोटीतील सर्वोच्च धावसंख्या २७८ आहे.

त्याच वेळी, एबी डिव्हिलियर्सने 228 एकदिवसीय सामने खेळले, ज्यामध्ये त्याने 53.50 च्या सरासरीने 9,577 धावा केल्या आहेत. वनडेमध्ये त्याच्या नावावर 25 शतके आणि 53 अर्धशतके आहेत. एकदिवसीय सामन्यात त्याची सर्वोच्च धावसंख्या १७६ आहे.
टी-20 मध्ये डिव्हिलियर्सने आपल्या देशासाठी 78 सामन्यात 1672 धावा केल्या. यादरम्यान त्याची सरासरी २६.१२ राहिली आहे. खेळाच्या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये त्याच्या नावावर 10 अर्धशतके आहेत आणि नाबाद 79 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे.

हे ही वाचलं का?

SCROLL FOR NEXT