चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : ब्रम्हपुरी तालुक्यात मंगळवारी (दि.१६) रोजी दुपारच्या सुमारास दोन वेगवेगळ्या ठिकाणी वाघाने हल्ला केला. यामध्ये दुधवाही येथील घटनेत एका शेतक-याचा मृत्यू झाला तर पद्मापूर येथील घटनेत एक गुराखी जखमी झाला आहे. मुखरू राऊत (वय ६२, रा. दूधवाही) असे मृत झालेल्या शेतकऱ्याचे तर प्रभाकर धोंडू मडावी (रा. पद्मापूर) असे जखमीचे नाव आहे.
ब्रह्मपुरी तालुक्यातील दुधवाही येथील शेतकरी मुखरू राऊत यांनी स्वत: च्या शेतावर धान पिकाची लागवड केली असल्याने ते नेहमीप्रमाणे मंगळवारी सकाळी शेतावर गेले होते. शेतावर धानपिकाची पहाणी करीत असताना शेतात दबा धरून बसलेल्या वाघाने त्याच्यावर अचानक हल्ला चढविला. यामध्ये ते जागीच ठार झाले. या घटनेची माहिती गावात मिळताच नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेत वनविभागाला घटनेची माहिती दिली. लगेच वनाधिकारी घटनास्थळी दाखल होत मृतदेहाचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले.
ही घटना ताजी असतानाच ब्रह्मपुरी तालुक्यातीलच पद्मापूर येथे वाघाने गुराख्यावर हल्ला चढवून गंभीर जखमी केल्याची घटना दुपारच्या सुमारास घडली. याबबातची माहिती अशी की, पद्मापूर येथील गुराखी प्रभाकर धोंडू मडावी हा गावापासून एक किलोमीटर अंतरावर जनावरे चरण्यासाठी जंगलात गेला होता. जंगलात जनावरे चारत असताना दबा धरून बसलेल्या वाघाने गुराख्यावर अचानक हल्ला चढविला. गुराख्याने प्रचंड आरडा -ओरड केल्याने वाघ घाबरून जंगलाच्या दिशेने पळून गेला. मात्र, गुराखी प्रभाकर धोंडू मडावी हा गंभीर जखमी झाला. त्याला तत्काळ ब्रम्हपुरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्यात आले.
चिमूर येथील एका कार्यक्रमासाठी गेलेले खासदार अशोक नेते यांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी माजी आमदार अतुल देशकर यांच्यासह जखमीची ब्रम्हपुरी रुग्णालयात भेट घेतली. त्यानंतर विभागीय वन अधिकारी दिपेश मल्होत्रा यांच्याची बैठक घेऊन वाघाच्या बंदोबस्तासाठी ठोस पाऊले उचलावी असे निर्देश वनविभागाला दिले.
हेही वाचलंत का?