संगमनेर: पुलाचे कठडे तोडून पिकअप पडली प्रवरा नदीत, दोघेजण गेले पुराच्या पाण्यात वाहून | पुढारी

संगमनेर: पुलाचे कठडे तोडून पिकअप पडली प्रवरा नदीत, दोघेजण गेले पुराच्या पाण्यात वाहून

संगमनेर, पुढारी वृत्तसेवा: मालवाहतूक करणारी पिकअप प्रवरा नदीचे कठडे तोडून पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेल्याची घटना रात्री नऊ ते साडे नऊच्या सुमारास संगमनेर तालुक्यातील जोर्वे आणि पिंपरणे या दोन्ही गावांना जोडणाऱ्या पुलावर घडली. यामध्ये जणांचा समावेश होता. नाशिकच्या सिडको येथील रहिवासी असणाऱ्या अलीम खान यांच्या मालकीची पिक अप (एम.एच15 एफव्ही 8943) ही खिडकीच्या काचा घेऊन संगमनेर तालुक्यातील ओझर बु. येथे संदीप नागरे यांच्याकडे आली होती. काचा खाली करून माघारी जात असताना पिकअप जोर्वे येथील प्रवरा नदीच्या पुलावर आली आणि पुलाचे कठडे तुटून नदीपात्रात पडली. त्याचवेळी प्रसंगावाधन राखत पिकअपचा क्लिनर अमोल खंदारे यांनी दरवाजा उघडून गाडीतून उडी मारली. उडी मारल्यामुळे खंदारे यांचा वाचला. त्यांनी चालत थेट संगमनेर गाठले आणि तिथून एका गाडीने सरळ नाशिकला निघून गेले आणि मालकाला झालेल्या घटनेची माहिती दिली.

मंगळवारी सकाळी गावातील शेतकरी दूध घेऊन जात असताना त्यांना पुलावर गाडीच्या चाकाचे ठसे आढळून आले. त्यानंतर सदरच्या घटनेची माहिती ग्रामस्थांनी पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांना दिली. त्यांनी ही माहिती संगमनेर उपविभागाचे प्रांताधिकारी डॉ. शंशीकांत मंगरुळे व तालुका आपत्ती व्यवस्थापन प्रमुख तथा तहसिलदार अमोल निकम, पोलीस उपाधीक्षक राहुल मदने यांना देऊन त्यांच्याशी चर्चा केली.

पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांनी परिसरातील सर्व गावातील नागरिकांच्या व्हॉट्स ऍप, सोशल मिडियावरून सर्वत्र माहिती पसरवली असता, ही पिकअप ओझर बु. येथे संदीप नागरे यांच्या घरी काचा घेऊन आली असल्याची माहिती समजली. त्यानंतर सदरचा गाडीचा मालक हा अलीम खान, राहणार सिडको, असल्याचे नाशिक पोलिसांना समजले. त्यांनी खान यांच्याशी संपर्क साधून त्यास पोलीस ठाण्यात बोलून घेतले. त्यानंतर खान यांनी पिकअप चालक प्रकाश किसन सदावर्ते आणि क्लिन्नर अमोल अरुण खंदारे व त्यांचा चुलता सुभाष आनंदराव खंदारे रा. जालना हे तिघे घेऊन गेले असल्याचे सांगितले. पोलिसांनी दिवसभर त्या गाडीचा आणि वाहून गेलेल्या दोघांचा शोध घेतला मात्र अद्याप कोणाचाही थांबपत्ता लागलेला नाही. त्यातच प्रवरा नदीला पुराचे पाणी असल्यामुळे शोध घेण्यास पोलिसांना अनेक अडथळे येत आहे.

Back to top button