Latest

Sachin Tendulkar’s Statue | मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सचिन तेंडुलकरचा पुतळा उभारणार : ‘एमसीए’ अध्‍यक्ष अमोल काळेंची माहिती

अविनाश सुतार

पुढारी ऑनलाईन डेस्क : क्रिकेटमधील उल्लेखनीय योगदानाबद्दल मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मोठा सन्मान करण्यात येणार आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सचिन तेंडुलकरचा  पुतळा (Sachin Tendulkar's Statue) उभा करण्यात येणार आहे. २०२३ च्या आयसीसी विश्वचषकावेळी या पुतळ्याचे अनावरण केले जाईल, अशी माहिती मुंबई क्रिकेट असोसिएशनचे (एमसीए) अध्यक्ष अमोल काळे यांनी आज (दि.२८) एमसीएमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना दिली.

आयकॉनिक स्टेडियममध्ये एखाद्या खेळाडूचा पुतळा (Sachin Tendulkar's Statue) बसवण्याची ही पहिलीच घटना आहे. हा पुतळा एमसीए लाउंजच्या बाहेर वर्तुळाकार प्लॅटफॉर्मवर उभारला जाईल. सचिन तेंडुलकर आपल्या वयाचे सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करत असताना हा पुतळा महत्त्वाचा ठरणार आहे. २०२३ मध्ये भारतात होणाऱ्या आयसीसी विश्वचषकादरम्यान या पुतळ्याचे अनावरण केले जाईल. कारण यावेळी क्रिकेट विश्वातील बरेच दिग्गज उपस्थित असतील. हा एक भव्य सोहळा करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे काळे यांनी सांगितले.

माझ्यासाठी सुखद आश्चर्य : सचिन तेंडुलकर

याबाबत सचिन तेंडुलकर यांनी आपल्या भावना व्यक्त करताना म्हटलं की, "पुतळा उभा करण्याचा निर्णय माझ्यासाठी सुखद आश्चर्य आहे. १९८८ मध्ये वानखेडेवरून मी माझ्या क्रिकेटचा प्रवास सुरू केला. मी पहिला रणजी सामना येथे खेळलो. आचरेकर सरांनी मला येथे क्रिकेटचे धडे दिले. तेव्हापासून मी एक गंभीर क्रिकेटपटू बनलो. मी माझा शेवटचा सामना याच ठिकाणी खेळलो आहे. या ठिकाणाच्या काही आठवणी माझ्यासाठी अद्भुत, काही संस्मरणीय आणि काही कटू आहेत."

मी येथे राहून खेळण्याचा आनंद लुटला आहे. माझ्यासाठी ही खास जागा आहे. पुतळ्याबाबत 'एमसीए'कडून मला सांगण्यात आले. तेव्हा मला सुखद धक्का बसला. यासारख्या गोष्टी दुर्मिळ आणि अद्वितीय आहे, माझ्यासाठी हा विशेष प्रसंग आहे. येथे कोणत्या प्रकारचा पुतळा तयार केला जाईल, यावर मी एमसीएसोबत चर्चा केली आहे, असेही तेंडुलकर यांनी सांगितले.

Sachin Tendulkar's Statue : माजी कर्णधार कर्नल सीके नायडू यांचे तीन पुतळे

देशभरातील क्रिकेट स्टेडियममध्ये आतापर्यंत भारताचे माजी कर्णधार कर्नल सीके नायडू यांचे फक्त तीन वेगवेगळे पुतळे उभारण्यात आले आहेत. ते इंदूरमधील होळकर स्टेडियम, नागपूरमधील विदर्भ क्रिकेट असोसिएशनचे स्टेडियम आणि आंध्रमधील व्हीडीसीए स्टेडियम येथे उभारण्यात आले आहेत.

सचिन तेंडुलकर भारतासाठी 200 कसोटी, 463 एकदिवसीय आणि 1 T20I सामना खेळला आहे. क्रिकेटमधील सर्व फॉर्मेटमध्‍ये त्‍याने एकूण 34 हजार 357 धावा केल्या आहेत. त्यांच्या नावावर 100 शतकांसह सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतकांचा विक्रम आहे. २०११ मध्ये वानखेडे स्‍टेडियमवर झालेल्‍या अंतिम सामन्‍यात भारताला विश्वचषकावर मोहर उमटवली होती.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT