Harmanpreet Kaur : 150 टी-20 सामने खेळणारी जगातील पहिली क्रिकेटर | पुढारी

Harmanpreet Kaur : 150 टी-20 सामने खेळणारी जगातील पहिली क्रिकेटर

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) 150 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळणारी जगातील पहिली क्रिकेटर ठरली आहे. केवळ महिलांमध्येच नव्हे तर पुरुषांसह 150 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने कोणीही खेळलेले नाहीत. हे स्थान मिळवणारी हरमनप्रीत पहिली खेळाडू आहे. तिने आयर्लंडविरुद्ध मैदानात उतरताच या विक्रमाला गवसणी घातली.

महिलांमध्ये हरमनप्रीत (Harmanpreet Kaur) पाठोपाठ न्यूझीलंडच्या सुझी बेट्सचा क्रमांक लागतो. 2007 मध्ये टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या बेट्सने तिच्या टी-20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत आतापर्यंत 143 सामने खेळले आहेत. तर, हरमनप्रीतने 2009 मध्ये पदार्पण केले होते. तिने आतापर्यंत भारतासाठी 150 टी-20 सामन्यांमध्ये 3006 धावा केल्या आहेत. हरमनप्रीत ही टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये तीन हजार धावा पूर्ण करणारी भारताची पहिली आणि एकूण चौथी महिला क्रिकेटपटू आहे. तिच्यापूर्वी सुझी बेट्स, मेग लॅनिंग आणि स्टेफनी टेलर यांनी अशी कामगिरी तीन हजार धावांचा टप्पा गाठला आहे.

बेट्सने 143 टी-20 सामन्यात 3820 धावा, ऑस्ट्रेलियाच्या लॅनिंगने 130 टी-20 सामन्यांत 3346 धावा, वेस्ट इंडिजच्या स्टेफनी टेलरने 113 टी-20 सामन्यात 3166 धावा केल्या आहेत. दुसरीकडे हरमनप्रीत (Harmanpreet Kaur) सामने खेळण्यात आघाडीवर असली तरी धावांच्या बाबतीत चौथ्या क्रमांकावर आहे. आपल्या टी-20 कारकिर्दीत तिने आतापर्यंत एक शतक आणि नऊ अर्धशतके झळकावली आहेत. 103 ही तिचे सर्वोत्तम खेळी आहे. याशिवाय गोलंदाजी करताना हरमनने 32 विकेट्सही घेतल्या आहेत.

महिला टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणा-या खेळाडू

सुजी बेट्स (NZ) : 143 सामने : 3820 धावा : 1 शतक : 25 अर्धशतके
मेग लॅनिंग (AUS) : 130 सामने : 3346 धावा : 2 शतके : 15 अर्धशतके
स्टेफनी टेलर (WI) : 113 सामने : 3166 धावा : 21 अर्धशतके
हरमनप्रीत कौर (IND) : 150 सामने : 3006 धावा : 1 शतक : 9 अर्धशतके
सोफी डिवाइन (NZ) : 119 सामने : 2969 धावा : 1 शतक : 17 अर्धशतके
स्मृति मानधना (IND) : 115 सामने : 2800 धावा : 22 अर्धशतके

कोणत्याही पुरुष क्रिकेटपटूने 150 आंतरराष्ट्रीय सामने खेळलेले नाहीत. सर्वाधिक सामने खेळण्याचा विक्रम भारताच्या रोहित शर्माच्या नावावर आहे. त्याने आपल्या कारकिर्दीत एकूण 148 आंतरराष्ट्रीय टी-20 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 31.32 च्या सरासरीने 3853 धावा केल्या आहेत. हरमनप्रीत रोहितच्या पुढे गेली आहे. रोहितशिवाय पाकिस्तानच्या शोएब मलिकने 124 टी-20 सामने खेळले आहेत. त्याचबरोबर न्यूझीलंडच्या मार्टिन गुप्टिलने 122 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.

Back to top button