Latest

गर्भवती महिलेची विहिरीत उडी; पाण्यातच दिला बाळाला जन्म; पण… चंद्रपूरमधील धक्कादायक घटना

मोहन कारंडे

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : चंद्रपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. नऊ महिन्याच्या गर्भवती महिलेने विहिरीत उडी घेतली. पाण्यात उडी घेतल्यानंतर तिने बाळाला जन्म दिला. पण पाण्यात बुडाल्याने दोघांचाही मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना चंद्रपूर जिल्ह्यात सूमठाणा येथे शुक्रवारी रात्री घडली. निकिता ठेंगणे (वय २७) असे मृत महिलेचे नाव आहे. पोलिसांनी शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात दिले. या घटनेने जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे निकिताचा पहिला मुलगा एक वर्षाचा असताना मरण पावला, तर आठ महिन्यांच्या मुलीचा देखील पाळण्यातच मृत्यू झाला होता.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भद्रावती शहरातील नवीन सुमठाणा परिसरातील विहिरीत गर्भवती असलेल्या निकिता ठेंगणे हिने जीवन संपवण्याच्या उदेश्याने शुक्रवारी रात्री विहिरीत उडी घेतली. विहिरीत उडी घेतल्यानंतर पाण्यातच तिची प्रसूती झाली. तिने पाण्यातच बाळाला जन्म दिला पण पाण्यात बुडाल्याने तिचा आणि नवजात बाळाचा बुडून मृत्यू झाला.

घरच्यांनी शोधाशोध केली असता तिचा मृतदेह विहिरीत आढळून आला. घटनेची माहिती मिळताच भद्रावती पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी विहिरीतून महिलेचा मृतदेह बाहेर काढला. मृतदेह उत्तरीय तपासणीकरीता पाठविले असता निकीता नऊ महिन्यांची गर्भवती असताना तिच्या उदरात अर्भक आढळून आले नाही. त्यामुळे रविवारी नवजात अर्भकाचा विहिरीत शोध घेतला. नगरपालिका प्रशासनाच्या मदतीने शोध घेतल्यानंतर नवजात अर्भक विहिरीत आढळून आले. निकिता हिला पहिला मुलगा झाला होता. मात्र एक वर्षाचा असताना त्याचा मृत्यू झाला होता. त्यानंतर दुसरी मुलगी झाली होती. पण तिचाही आठ महिन्यांची असताना मृत्यू झाला होता. या दोन्ही घटनांमुळे निकिता खचली होती. आई व नवजात बाळाचा विहिरीतच मृत्यू झाल्याने जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT