Duplicate Medicine : भारतीय औषध बाजारात बनावट औषधांचा सुळसुळाट | पुढारी

Duplicate Medicine : भारतीय औषध बाजारात बनावट औषधांचा सुळसुळाट

कोल्हापूर ; राजेंद्र जोशी : भारतीय औषध बाजारात सध्या दर्जाहीन आणि बनावट औषधांनी प्रशासकीय यंत्रणेला झुगारा देऊन बाजारात लिलया प्रवेश मिळविल्याने रुग्णांच्या आरोग्यापुढे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. या यंत्रणेची पाळेमुळे शोधण्यासाठी आता औषध कंपन्या आणि अन्न व औषध प्रशासन जागे झाले असले, तरी या समांतर यंत्रणेने खोलवर पसरलेले आपले हातपाय पाहता सर्वसामान्यांच्या जीवाच्या मोबदल्यात गब्बर होणार्‍या नफेखोरांच्या या मोठ्या साखळीला नेस्तनाबूत करण्यासाठी तत्काळ कठोर पावले उचलावी लागतील. यंत्रणेने 2019-20 मध्ये अचानक तपासणी मोहिमेत तपासलेल्या 81 हजार 329 औषधांच्या नमुन्यांमध्ये 2 हजार 497 औषधांचे नमुने दर्जाहीन होते, तर 199 औषधे बनावट असल्याचे निदर्शनास आले. 2020-21 मध्ये या दर्जाहीन औषधांच्या प्रमाणात वाढ होऊन 2 हजार 652 नमुने दर्जाहीन ठरले, तर 263 औषधे बनावट असल्याचे सिद्ध झाले. संबंधित औषधांत सर्वसामान्यांच्या दैनंदिन औषधांचा समावेश आहे.

यामध्ये बनावट औषधांच्या यादीत सर्वाधिक 35.4 टक्के इतके प्रमाण प्रतिजैविकांचे आहे. पुरुषांसाठी लैंगिक शक्ती वाढविणार्‍या औषधांचे प्रमाण 15.6 टक्के, वेदनाशामक आणि हिवतापविरोधी औषधांचे प्रमाण अनुक्रमे 10.4 आणि 8.9 टक्के, तर अन्य औषधांचे एकत्रित प्रमाण 29.9 टक्क्यांवर आहे.

ड्रग माफियांकडून चकवा

हिमाचल प्रदेशात बद्दी जिल्ह्यात औषधनिर्मितीचा उद्योग मोठा आहे. केंद्र सरकारने उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी मोठ्या औद्योगिक वसाहतीची निर्मिती बद्दी येथे केली. तेथील व्यवसायावर नजर ठेवण्यासाठी आता हिमाचलच्या अन्न व औषध प्रशासनाने एक स्वतंत्र पथक तैनात केले आहे. परंतु, ड्रग माफियांनी त्यांनाही चकवा देऊन बाजारात औषधे आणण्याचा उद्योग सुरू केला आहे. अलीकडेच या पथकाने या टोळीच्या सूत्रधाराला ताब्यात घेऊन औषध बाजारातील मोठ्या कंपन्यांच्या लोकप्रिय ब्रँडच्या नावाने बनविलेला सुमारे दीड कोटी रुपयांचा साठा जप्ता केला.

Back to top button