पुढारी ऑनलाईन डेस्क : सुरतमधील एका तरुणाने आपण इस्रोचा वैज्ञानिक असल्याचा दावा केला आहे. त्यानेच विक्रम लँडर मॉड्यूलची डिझाइन केली होती. ज्यामुळे चांद्रयान-३ मोहीम यशस्वी झाली आणि लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरू शकला, असाही दावा त्याने केला आहे. मितुल त्रिवेदी असे या तरूणाचे नाव आहे. पोलिस त्याच्या दाव्याची चौकशी करत आहेत. सुरतचे आयुक्त अजय तोमर यांनी गुन्हे शाखेला याबाबत पडताळणी करण्यास सांगितले आहे.
पोलिस उपायुक्त हेतल पटेल यांनी सांगितले की, मितुल त्रिवेदी हा विक्रम लँडर मॉड्यूल डिझाइन केले असल्याचे स्थानिक माध्यमांना मुलाखतीत सांगत आहे. इस्रोने आपल्याला चांद्रयान मोहिमेवर काम करण्यासाठी आमंत्रित केले होते, असा दावा त्यांनी केला आहे. इस्रोमध्ये काम करताना त्यांनी लँडरच्या मूळ डिझाइनमध्ये अनेक बदल केले, ज्यामुळे लँडर मॉड्यूलचे यशस्वी लँडिंग झाले. वैज्ञानिक असण्याच्या प्रश्नावर मितुल म्हणतो की तो एक फ्रीलान्सर आहे. त्यांनी नासासोबतही काम केल्याचा दावा केला आहे.
डीसीपी पटेल यांनी सुरतच्या आयुक्तांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले असल्याचे सांगितले. दाव्यांच्या समर्थनार्थ पुरावे सादर करण्यासाठी शुक्रवारी काही स्थानिक माध्यमांना त्यांच्या कार्यालयात बोलावण्यात आले. मात्र, अद्याप त्यांच्या दाव्याच्या समर्थनार्थ कोणतेही कागदपत्र सादर करू शकलेले नाहीत. दरम्यान, त्याच्याकडे फक्त बीकॉमची पदवी असल्याचे तपासात समोर आले आहे. मितुल त्रिवेदी हा इस्रोचा वैज्ञानिक नाही. गुन्हे शाखेकडून तपास सुरू आहे. तपासात तो खोटे बोलत असल्याचे आढळून आल्यास त्याच्याविरुद्ध एफआयआर नोंदवून कायदेशीर कारवाई केली जाईल, असे डीसीपी हेतल यांनी सांगितले.
हेही वाचा :