इस्रो अंतराळात मानव पाठवणार; सात अंतराळ मोहिमांची घोषणा | पुढारी

इस्रो अंतराळात मानव पाठवणार; सात अंतराळ मोहिमांची घोषणा

बंगळूर, पीटीआय : ‘चांद्रयान-3’च्या ऐतिहासिक यशानंतर अंतराळात मानवयुक्त मोहीम राबविण्याची इस्रोची दीर्घकाळ सुरू असलेली पूर्वतयारी अंतिम टप्प्यात आली आहे. चालू वर्षाच्या अखेरीलाच किंवा पुढील वर्षी पहिल्या तिमाहीत ही मोहीम राबविली जाईल. इस्रोचे शास्त्रज्ञ एन. रघू सिंग यांनी शुक्रवारी पीटीआयशी बोलताना या वृत्ताला दुजोरा दिला. इस्रोच्या सात अंतराळ मोहिमांची माहिती दिली. यापैकी एक मोहीम अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था नासासोबत केली जाणार आहे.

इस्रोच्या गगनयानअंतर्गत 3 मोहिमांसह अन्य सहा मोहिमा राबविल्या जातील. पहिल्या दोन मोहिमांतून अंतराळवीर नसतील. तिसर्‍या मोहिमेत मात्र तीन अंतराळवीरांचा सहभाग असेल. तीन दिवसांसाठी या तिघांना तळातील अंतराळात पाठविण्यात येईल. मार्च 2024 पूर्वी हे घडेल, असे ठरले आहे. पहिल्या दोन्ही मोहिमा यशस्वी व्हाव्यात, ही त्यासाठीची अट असेल.

तिघा अंतराळवीरांसह पृथ्वीपासून 400 कि.मी. उंचीवरून सलग तीन दिवस गगनयान प्रदक्षिणा घालेल आणि त्यानंतर क्रू मॉड्यूल यानापासून वेगळे करून पृथ्वीवर उतरविण्यात येईल.

अंतराळात मानवयुक्त मोहिमा राबविण्यात आजवर रशिया, अमेरिका, चीन या तीनच देशांना यश आलेले आहे. गगनयानच्या मानव मोहिमेनंतर भारतही या यादीत आलेला असेल.

पुढच्याच वर्षी ल्युपेक्स ही नवी चांद्रमोहीमही भारत लाँच करणार आहे. भारत आणि जपानचा हा संयुक्त उपक्रम आहे. चंद्रावरील पाण्याचे विश्लेषण, हे या मोहिमेचे उद्दिष्ट आहे. यानंतर इस्रो सूर्यासह मंगळ आणि शुक्र ग्रहापर्यंत भिडण्याच्या तयारीत आहे.

सूर्य अध्ययनासाठी आदित्य एल-1

सूर्याचे अध्ययन करण्यासाठी आदित्य एल-1 ही इस्रोची सूर्यमोहीमही पुढच्या टप्प्यात आहे. स्पेसक्राफ्ट सूर्य-पृथ्वी दरम्यानच्या हॅलो ऑर्बिटमध्ये (कक्षेत) स्थिरावेल. पृथ्वीपासून ते 15 लाख कि.मी. अंतरावर आहे.

‘मंगळयान-2’ लवकरच

मंगळयान-2 मध्ये यावेळी हाय पर्स्पेक्ट्रल कॅमेरा आणि रडारही ऑर्बिटल प्रोबमध्ये लावले जाईल. पहिल्या मंगळयानासाठी भारताला 450 कोटी रुपये खर्च आला होता. इतक्या कमी खर्चाची ही जगातील पहिली मंगळ मोहीम ठरली.

शुक्रयानही रांगेत

मंगळ विजयानंतर इस्रो शुक्र ग्रहावर यान पाठवेल. अमेरिका, युरोपीयन अंतराळ संस्था आणि चीननेही त्यावर काम सुरू केले आहे. भारतही स्पर्धेत उतरला आहे.

स्पेस डॉकिंग एक्सपरिमेंट

भारताने भविष्यात आपले अंतराळ स्थानक बनविले तर त्यासाठी स्पेस डॉकची गरज भासेल म्हणून तेही तयार केले जात आहे.

भारत राबविणार जगातील दुसरी किरण शोधमोहीम

एक्स-रे पोलारिमीटर उपग्रह म्हणजेच एक्सपोसॅट ही मोहीम तेजस्वी खगोलीय क्ष-किरण स्रोतांचा, त्यांच्या गतीचा अभ्यास करणारी जगातील दुसरी ध्रुवीय मोहीम इस्रो राबविणार आहे. इस्रोचा हा उपग्रह पृथ्वीच्या खालच्या कक्षेत पाठवला जाईल. प्राथमिक पेलोड खगोलीय उत्पत्तीच्या 8-30 केईव्ही फोटॉनच्या मध्यम एक्स-रे ऊर्जा श्रेणीचे मापन करेल.

तीन अंतराळवीरांना रशियात प्रशिक्षण

मानवाला अंतराळात पाठविण्याच्या मोहिमेची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. त्यासाठी तिघा अंतराळवीरांना रशियात प्रशिक्षित करण्यात आलेले असून, क्रू मॉड्यूलही सज्ज आहे. हे प्रक्षेपणही एलएमव्ही-3 या महाबली रॉकेटच्याच माध्यमातून केले जाईल. तेही भारताकडे आहे.

निसार मोहिमेत पृथ्वीवरील बदलांचा अभ्यास करणार

नासासह निसार मोहीमही राबविली जाणार आहे. यातून पृथ्वीच्या बदलत चाललेल्या इको सिस्टीमचे अध्ययन केले जाईल. भूजल प्रवाह, ज्वालामुखी, ग्लेशियर वितळणे आदींचा सखोल अभ्यास केला जाईल. भूकंप होणार असलेल्या ठिकाणाची ओळख त्यामुळे पटू शकेल. 1.5 अब्ज डॉलर खर्च असलेला हा जगातील सर्वांत महागडा उपग्रह असेल. जानेवारी 2024 मध्येच त्याचे प्रक्षेपण नियोजित आहे.

Back to top button