Latest

नवीन संसद इमारतीवर 9500 किलोचा धातूचा अशोक स्तंभ

Shambhuraj Pachindre

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा राजधानी दिल्लीत सध्या नव्या संसद भवनाचे काम वेगाने सुरू आहे. सोमवारी या इमारतीच्या वरील भागावर भारताचे राष्ट्रीय चिन्ह असलेल्या अशोक स्तंभाची उभारणी करण्यात आली. कांस्य (तांबे) या धातूपासून बनवलेल्या या स्तंभाचे वजन 9500 किलो आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते स्तंभाचे अनावरण करण्यात आले.

या वेळी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी, संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी उपस्थित होते. या अनावरणानंतर पंतप्रधान मोदींनी येथील कामगारांशी संवाद साधला. काय वाटते, केवळ एक इमारत उभी करत आहात की इतिहास घडवत आहात? असा सवाल मोदींनी कामगारांना केला. त्यावर सर्व कामगारांनी इतिहास घडवत असल्याचे उत्तर दिले.

नव्या संसद भवनाच्या छतावर बसवण्यापूर्वी हा अशोक स्तंभ 8 टप्प्यांतून गेला आहे. त्यात क्‍ले मॉडेलिंग, कॉम्प्युटर ग्राफिक, ब्रॉन्झ कास्टिंग आणि पॉलिशिंग या प्रक्रियांचा समावेश आहे.

ओवैसींचा आक्षेप
एआयएमआयएम पक्षाचे प्रमुख खा. असदुद्दीन ओवैसी यांनी अशोक स्तंभाचे अनावरण मोदींनी करण्यावरून आक्षेप घेतला आहे. संविधानात संसद, सरकार आणि न्यायपालिका या स्वतंत्र शक्‍ती आहेत. पंतप्रधान सरकारचे प्रमुख आहेत, लोकसभेचे नाही. त्यांनी संसद भवनावरील राष्ट्रीय प्रतीकाचे अनावरण करायला नको होते. हा अधिकार लोकसभा अध्यक्षांचा आहे. लोकसभा अध्यक्ष सरकारच्या अधीन नसतात. पंतप्रधानांनी सर्व संवैधानिक मानदंडांचे उल्लंघन केले आहे.

असा आहे अशोक स्तंभ

  • देशातील सर्वात भव्य अशोक स्तंभ
  •  हा स्तंभ संपूर्ण शुद्ध कांस्य या धातूचा
  •  वजन 9.5 टन, उंची 6.5 मीटर
  • आधारासाठी 6500 किलो पोलादी रचना
  •  एक हजार कोटी खर्च आल्याची माहिती
  •  100 कारागिरांनी 6 महिन्यांत बनवला

हेही वाचा

SCROLL FOR NEXT