डेहराडून : उत्तराखंडमधील नैनिताल जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नैनिताल जिल्ह्यातील नवोदय विद्यालयात 85 मुले कोरोना पॉझिटिव्ह आढळली आहेत. तर काही मुलांचे अहवाल येणे बाकी आहे. नुकतेच शाळेच्या मुख्याध्यापकांसह काहीजण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले होते. त्यानंतर 488 मुलांची कोरोना चाचणी करण्यात आली. आता 85 मुले कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने खळबळ उडाली आहे.
गेल्या 24 तासांत राज्यात ओमिक्रॉनची चार नवीन प्रकरणे समोर आल्याची माहिती येथील अधिकाऱ्यांनी दिली आहे. यापूर्वी ओमिक्रॉनची लागण झालेले चार लोक बरे झाले आहेत. राज्यात 11 डिसेंबर रोजी ओमिक्रॉनचा एक रुग्ण आढळून आला, तर 27 डिसेंबर रोजी आणखी तीन प्रकरणे नोंदवली गेली.
या चार नवीन प्रकरणांपैकी तीन प्रकरणे डेहराडूनमधील आहेत आणि एक प्रकरण गुजरातमधील अहमदाबादमधील आहे. संक्रमित व्यक्तींपैकी तीन जण 23 ते 28 वर्षे वयोगटातील आहेत, तर यामध्ये एका 15 वर्षांच्या किशोरवयीन मुलाचा समावेश आहे.
संक्रमित व्यक्तींमध्ये डेहराडूनमधील 28 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे, जो गुरुग्राममार्गे परदेशातून परतला होता. आणखी एक 23 वर्षीय पुरुष जो नुकताच गुरुग्रामहून परतला होता, त्याच्या संपर्कात आलेला एक 15 वर्षीय मुलाबरोबर अहमदाबादमधील 27 वर्षीय तरुणाचाही समावेश आहे, जो 21 डिसेंबरला ऋषिकेशला आला होता. अहमदाबादमधील व्यक्ती आधीच परतली असल्याने गुजरात सरकारला याबाबत माहिती देण्यात आली आहे.