मुंबईत ९ केंद्रांवर उद्यापासून मुलांंसाठी लसीकरण मोहीम | पुढारी

मुंबईत ९ केंद्रांवर उद्यापासून मुलांंसाठी लसीकरण मोहीम

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी 15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांचे लसीकरण मुंबईत सोमवारपासून सुरू होत आहे. केंद्र सरकारच्या निर्देशानुसार 1 जानेवारीपासून मुलांच्या लसीकरणाची नोंदणी सुरू झाली. प्रत्यक्ष डोस 3 जानेवारीपासून दिला जाईल. या मोहिमेेसाठी मुंबईत एकूण नऊ लसीकरण केंद्रे निश्चित करण्यात आली असून पर्यावरण व पर्यटन मंत्री आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते वांद्रे-कुर्ला संकुल कोविड लसीकरण केंद्रातून या मोहिमेचा शुभारंभ होईल.

ऑनलाईन व ऑफलाईन अशा दोन्ही माध्यमांतून नोंदणीची सोय उपलब्ध असल्याने पालकांनी पाल्याचे लसीकरण करून घेण्याचे आवाहन महानगरपालिकेने केले आहे.

इथे मिळेल मुलांना लस

मुलांचे लसीकरण यासाठी विभागवार 9 लसीकरण केंद्रे मुंबईत सज्ज झाली आहेत. मुले राहात असलेल्या विभागासाठी निश्‍चित केलेल्या केंद्रावरच लस घ्यावी, अशी अपेक्षा असून, महापालिकेने ही विभागवार केंद्रांची यादीही शनिवारी जाहीर केली ती अशी-

1. ए, बी, सी, डी, ई या पाच प्रशासकीय विभागांसाठी भायखळामधील रिचर्डसन क्रूडास भायखळा कोविड लसीकरण केंद्र

2. एफ/उत्तर, एल, एम/पूर्व, एम/पश्चिम या चार विभागांसाठी शीव (सायन) येथील सोमय्या मैदानावरील जम्बो कोविड लसीकरण केंद्र

3. एफ/ दक्षिण, जी/ दक्षिण, जी/उत्तर या तीन विभागांसाठी वरळीतील एनएससीआय डोम जम्बो कोविड लसीकरण केंद्र

4. एच/पूर्व, के/पूर्व, एच/पश्चिम या तीन विभागांसाठी वांद्रे-कुर्ला संकुलातील बीकेसी जम्बो कोविड लसीकरण केंद्र

5. के/ पश्चिम, पी/ दक्षिण या दोन विभागांसाठी गोरेगाव (पूर्व) मधील नेस्को जम्बो कोविड लसीकरण केंद्र

6. आर/ दक्षिण, पी/ उत्तर या दोन विभागांसाठी मालाड (पश्चिम) मधील मालाड जम्बो कोविड लसीकरण केंद्र

7. आर/ मध्य, आर/ उत्तर विभागांसाठी दहिसर जम्बो कोविड लसीकरण केंद्र

8. एन, एस विभागांसाठी कांजूरमार्ग (पूर्व) मधील क्रॉम्प्टन ऍण्ड ग्रीव्हस् जम्बो कोविड लसीकरण केंद्र

9. टी विभागासाठी मुलूंड (पश्चिम) मधील रिचर्डसन क्रूडास मुलूंड जम्बो कोविड लसीकरण केंद्र

या व्यतिरिक्त परळमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रेल्वे रुग्णालय येथे रेल्वे कर्मचार्‍यांच्या याच वयोगटातील मुलांना देखील लस मिळेल.

* 15 ते 18 वयोगटातील म्हणजेच 2007 वा त्यापूर्वी जन्मवर्ष असलेले विद्यार्थी लसीकरणासाठी पात्र राहतील.
* बीकेसी कोविड केंद्रावर महानगरपालिकेच्या शाळांमधील मुलांसह इतरही मुलांना विनामूल्य लस मिळेल.
* मुलांना केवळ कोव्हॅक्सिनचाच डोस देण्यात येणार आहे. मुलांना केंद्रावर थेट जाऊन वॉक इन पद्धतीने लस
घेता येईल.

Back to top button