कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा
कळंबा मध्यवर्ती कारागृहातील संरक्षक भिंतीवरून उडी टाकून त्याने पलायन करून खळबळ उडवून दिली. मात्र, सख्ख्या बहिणीने समजूत काढून त्याला राजवाडा पोलिसांच्या हवाली केल्याची घटना घडली. राहुल संजीव मगदूम (वय 32, रा. भामटे, ता. करवीर) असे त्याचे नाव आहे. संशयित लष्करातील जवान आहे. सप्टेंबरमध्ये सुट्टीसाठी गावाकडे आल्यानंतर किरकोळ कारणातून तलवारीने हल्ला करून एकाला जखमी केले होते.
कळंबा कारागृहातील सुरक्षा रक्षकांची नजर चुकवून संशयिताने कारागृह अंतर्गत क्वारंटाईन विभाग मुलाखत कक्षाजवळील तारेच्या कंपाऊंडच्या संरक्षक भिंतीवरून उडी टाकून पलायन केले होते. शुक्रवारी दुपारी घडलेल्या प्रकारामुळे कारागृह व्यवस्थापनासह पोलिसांची तारांबळ उडाली होती. कारागृह परिसरात नाकाबंदी करून शोधमोहीम राबविण्यात आली. मात्र, संशयित सापडला नव्हता.
राहुल मगदूम याची सख्खी बहीण संभाजीनगर परिसरात राहते. संशयित थेट बहिणीच्या घरी पोहोचला.
बहिणीसह मेव्हुण्याला संशय आला. चौकशी केल्यानंतर त्याने पळून आल्याची कबुली दिली. भावाची समजूत घालून त्याला राजवाडा पोलिसांच्या हवाली केले. संशयित जवान असून सप्टेंबरमध्ये सुट्टीवर गावाकडे आला होता. या काळात किरकोळ कारणातून वादावादी झाली. याने तरुणांवर हल्ला केला होता. त्याच्यावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला होता. करवीर पोलिसांनी त्यास अटक केली. कळंबा कारागृहात रवानगी झाली होती.