Latest

कोल्हापूर जिल्ह्यात बेकारांची सर्वांत मोठी फौज; महाराष्ट्रात ६२ लाख ७ हजार २६६ बेरोजगारांची नोंद

मोहन कारंडे

कोल्हापूर : सुनील कदम : दरडोई उत्पन्नात राज्यात 'टॉप टेन 'मध्ये असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यात बेकारांची सर्वांत मोठी फौज आहे, असे म्हटल्यास कुणाचा विश्वास बसणार नाही; पण हे खरे आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक आठ लाख बेरोजगार युवक कोल्हापूर जिल्ह्यात आहेत. शासकीय आकडेवारीतूनच ही चिंताजनक बाब चव्हाट्यावर आलेली आहे. विशेष म्हणजे, २ कोटींहून अधिक लोकसंख्येच्या मुंबईत बेरोजगारांचे प्रमाण फक्त १.८१ टक्के असल्याचे शासकीय नोंदी सांगतात.

राज्याच्या रोजगार आणि उद्योजकता विभागाकडील नोंदीनुसार राज्यातील नोंदीत बेरोजगार युवकांची संख्या ६२ लाख ७ हजार २६६ इतकी आहे. यापैकी मुंबईत ३ लाख ८६ हजार १६७, ठाण्यात ३ लाख ७२ हजार ६१, पुण्यात ४ लाख ७२ हजार ४०, छत्रपती संभाजीनगरमध्ये २ लाख ९३ हजार २६५, नागपुरात २ लाख ९७ हजार १७१ आणि कोल्हापूर जिल्ह्यात २ लाख ७३ हजार ३६७ बेरोजगार युवकांच्या नोंदी रोजगार केंद्राकडे आढळून येतात. या आकडेवारीवरून पुणे, मुंबई आणि ठाण्यात सर्वाधिक बेरोजगार युवक असल्याचा समज होतो. मात्र लोकसंख्येच्या निकषावर तपासले तर कोल्हापूर जिल्ह्यातच बेरोजगारीचे प्रमाण राज्यात सर्वाधिक असल्याचे दिसून येते.

लोकसंख्येच्या प्रमाणात बेकार

मुंबईची आजची लोकसंख्या २ कोटी १२ लाख ९७ हजार इतकी आहे, त्या तुलनेत मुंबईतील बेरोजगारांचे प्रमाण केवळ १.८१ टक्के इतकेच येते. याच निकषानुसार ठाणे २.४२ टक्के, नाशिक ३.८८, नागपूर ५.५८, पुणे ३.८२ आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बेरोजगारीचे प्रमाण ६.१८ टक्के इतके येते. कोल्हापूर जिल्ह्यात मात्र बेरोजगार युवकांचे प्रमाण तब्बल ६.४१ टक्के आहे. राज्याच्या अन्य कोणत्याही जिल्ह्यात कोल्हापूर जिल्ह्याइतके बेरोजगारांचे प्रमाण आणि संख्याही नाही.

कोल्हापूर जिल्ह्यात फक्त दोन लाख ७३ हजार ३६७ बेरोजगार युवकांची नोंदणी झालेली आहे. मात्र नोंदणी न झालेल्या बेरोजगार युवकांचे प्रचंड प्रमाण विचारात घेता हा आकडा जवळपास आठ लाखांच्या घरात असण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
विशेष म्हणजे बेरोजगारीचे हे प्रमाण केवळ शासनाकडे नोंदणी झालेल्या बेरोजगार युवकांचे आहे. शासनाकडे नोंदणीच न झालेल्या किंवा केलेल्या बेरोजगार युवकांचे प्रमाण यापेक्षा दुप्पट असण्याचा अंदाज आहे. ती आकडेवारी विचारात घेतली तर जिल्ह्यातील बेरोजगार युवकांचा आकडा पोहोचतो आठ लाख २० हजारावर! म्हणजे जिल्ह्याच्या एकूण लोकसंख्येच्या १९.२४ टक्के जनता बेरोजगार आहे. अधिक सोप्या शब्दात सांगायचे तर आज जिल्ह्यातील दर पाच माणसामागील एक माणूस बेरोजगार आहे, असे समजायला हरकत नाही.

कोल्हापूर जिल्ह्याच्या बेरोजगारीचा पट!

• एकूण लोकसंख्या ४२ लाख ६२ हजार
• नोंदीत बेरोजगार २ लाख ७३ हजार ३६७
• बिगरनोंदीत बेरोजगारांची संख्या दुप्पट
• एकूण बेरोजगार ८ लाख २० हजारांवर
• बेरोजगारीचे प्रमाण १९.२४ टक्के
• औद्योगिक विकासाअभावी वाताहत

राजकारण्यांचा कच्चा माल… बेरोजगारांचे तांडे!

कोल्हापूर शहरातील प्रत्येक राजकीय पक्षाकडे आणि सर्वच राजकीय नेत्यांकडे युवक कार्यकत्यांच्या पलटणीच्या पलटणी आहेत. हे दुसरे तिसरे कुठले युवक नाहीत तर ते बेरोजगारांच्या तांड्यातीलच आहेत. हाताला काम नसल्यामुळे या युवकांवर राजकीय नेत्यांच्या आगेमागे फिरून युवा कार्यकर्ता म्हणून मिरवण्याचे काम उरलेले आहे. जिल्ह्यातील हेच बेरोजगारांचे तांडे आजकाल बहुतेक सगळ्या राजकीय नेत्यांसाठी कच्चा माल म्हणून कामी येताना दिसतायत. त्यामुळे आपला हा कच्चा माल कधी संपू नये म्हणून जिल्ह्यातील राजकीय नेतेच या भागात कोणतेही उद्योगधंदे येऊ देत नसावेत की काय, अशी शंका कुणाच्या मनात आल्यात ते वावगे ठरू नये, इतके त्यात साम्य आढळते.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT