महामार्गावर भराव घालून पूल बांधण्यास विरोधच : हसन मुश्रीफ | पुढारी

महामार्गावर भराव घालून पूल बांधण्यास विरोधच : हसन मुश्रीफ

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गाच्या सहापदरीकरण कामात शिरोली ते पंचगंगा व कागल येथे भराव घालून उंची वाढवण्यात येणार आहे. अशा प्रकारे पूल बांधण्यास आपला विरोधच असल्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी सांगितले. या ठिकाणी पिलरवरील पूल उभारला पाहिजे, अशी आपलीही मागणी आहे. यासंदर्भात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली जाणार आहे. आवश्यकता भासल्यास दिल्लीलाही जाण्याची आपली तयारी असल्याचे त्यांनी सांगितले.

पुणे-बंगळूर महामार्गाच्या सहापदरीकरणाचे काम सुरू आहे. कोल्हापूर आणि परिसरात येणार्‍या महापुरात महामार्ग खंडीत होऊ नये, याकरिता ज्या ठिकाणी पुराचे पाणी येते, त्या ठिकाणी उंची वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र ही उंची वाढवताना ती भराव टाकून वाढवण्यात येणार आहे.

पुणे-बंगळूर महामार्गावर शिरोली ते पंचगंगा पूल यादरम्यान सध्या महामार्गाची उंची अधिकच आहे. त्यामुळे याच ठिकाणी पुरात मोठ्या प्रमाणात पाणी साचते. महापुरात तर या परिसराची धरणासारखी परिस्थिती निर्माण होते. त्याच ठिकाणी महामार्गाची सध्या आहे त्यापेक्षा अधिक उंची वाढवली जाणार आहे. यामुळे महापुरात महामार्गाचा संपर्क तुटणार नसला तरी कोल्हापूर शहरात मोठ्या प्रमाणात पाणी शिरण्याचा, शहरातील पूरपातळीत वाढ होण्याचा गंभीर धोका आहे. यामुळे महामार्गाची उंची भराव टाकून वाढवण्यास नागरिकांचा दिवसेंदिवस विरोध वाढत चालला आहे. त्याऐवजी पिलर टाकून उंची वाढवावी, अशी मागणी आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर पत्रकारांशी बोलताना पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आपलाही भराव टाकून पूल उभारण्यास विरोध असल्याचे सांगितले. सहापदरीकरणाच्या कामात कोल्हापूर आणि कागल येथे भराव टाकून उंची वाढवल्यास परिसरात पुराचा धोका आणखी वाढू शकतो. त्यामुळे भराव टाकून पूल करण्याऐवजी त्याठिकाणी पिलर उभारूनच पूल करावा लागेल. याकरिता आपण केंद्रीय मंत्री गडकरी यांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Back to top button