Latest

ठाणे : जन्मदात्या आईनेच केली ५ महिन्याच्या चिमुकल्याची हत्या

backup backup

ठाणे, पुढारी वृत्तसेवा

घरात झोपलेल्या अवघ्या पाच महिन्यांच्या मुलाला उचलून नेत प्लास्टिक ड्रम मध्ये बुडवून त्याची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार कळवा येथील महात्मा फुले नगरात शनिवारी सकाळी समोर आला होता. या प्रकरणी मुलाच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून कळवा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, कळवा पोलिसांनी या घटनेचा अवघ्या 24 तासाच्या आत छडा लावला. मृत झालेल्या चिमुकल्याच्या आईनेच त्याची हत्या केल्याचे खळबळजनक वास्तव पोलीस तपासातून समोर आले आहे. पोलिसांनी आईला अटक केली आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी दिली.

कळवा येथील महात्मा फुले नगरात सायबानगर पाईप लाईनजवळ राहणाऱ्या शांतीबाई चव्हाण (30) यांचा पाच महिन्यांचा मुलगा श्रीकांत हा गाढ झोपेत होता. त्यावेळी त्याला घरातून अज्ञात व्यक्तीने उचलून नेल्याची तक्रार तिने कळवा पोलिसात शुक्रवारी नोंदवली होती. त्यानंतर शनिवारी सकाळी श्रीकांत याचा मृतदेह चव्हाण यांच्या घराशेजारील गल्लीतील पाण्याच्या ड्रममध्ये सापडल्याने खळबळ उडाली.

या घटनेची माहिती मिळताच कळवा विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त व्यंकट आंधळे, पोलीस निरीक्षक सुदेश आजगावकर यांनी घटनास्थळी धाव घेत प्रकरणाचा तपास सुरु केला. त्यानंतर पोलिसांनी रोजंदारीवर काम करून कुटुंबाचा चरितार्थ चालवणाऱ्या शांतीबाई आणि त्यांचे पती शंकर यांची चौकशी केली. चौकशीवेळी मयत मुलाच्या आईने दिलेल्या जबाबावरून आणि तिच्या हावभावावरून पोलिसांना संशय आला. तिची कसून चौकशी केली असता तिनेच आपल्या मुलाची हत्या केल्याची कबुली दिली. पोलिसांनी मृत मुलाच्या आईस अटक केली असून या घटनेत आणखी कुणाचा सहभाग आहे का याचा तपास करीत आहे.

खोकल्याच्या औषधाचा ओव्हरडोस ठरला कारणीभूत

श्रीकांत याला शुक्रवारी खोकला येत होता. यावेळी त्याची आई शांताबाई चव्हाण हिने त्याला खोकल्याचे औषध दिले होते. औषधाचा ओव्हरडोस झाल्याने बाळाची प्रकृती बिघडली. त्यानंतर बाळाची शुद्ध हरपली. अशा परिस्थितीत बाळाला दवाखान्यात न नेता आईने त्यास घरात लपवून ठेवले आणि त्यास कुणीतरी उचलून नेले, असा बनाव केला. इतकेच नव्हे तर त्याच्या बेपत्ता होण्याची तक्रार देखील पोलीस ठाण्यात जाऊन दाखल केली. या साऱ्या नाट्यानंतर आईने शनिवारी पहाटे अंधाराचा फायदा घेऊन घरात लपवून ठेवलेले बाळ घरानजीकच्या पाण्याच्या प्लास्टिक ड्रममध्ये टाकून दिले. दरम्यान, जास्त प्रमाणात औषध दिल्याने बाळाचा मृत्यू झाला की, पाण्यात बुडून बाळाचा मृत्यू झाला हे शवविच्छेदन अहवालामधून निष्पन्न होईल, असे पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी सांगितले.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT