Latest

Nagar News : मुळा-भंडारदर्‍यातून 5.46 टीएमसी पाणी जायकवाडीला

अमृता चौगुले

नगर : पुढारी वृत्तसेवा :  नाशिक आणि अहमदनगर या दोन जिल्ह्यांतील धरणांतून एकूण 8.603 टीएमसी पाणी जायकवाडी धरणात सोडण्याच्या निर्णयावर अखेर शिक्कामोर्तब झाले. यामध्ये नगर जिल्ह्यातील भंडारदरा व निळवंडे धरणांतून मिळून 3.3 टीएमसी व मुळा धरणातून 2.1 टीएमसी असा एकूण 5.4 टीएमसी पाण्याचा समावेश आहे. यंदा अहमदनगर जिल्ह्यात पाऊस कमी झाला असताना आणि मुळा धरण पूर्ण क्षमतेने भरलेले नसतानाही जायकवाडी धरणात पाणी सोडण्याचा निर्णय झाल्यामुळे लाभक्षेत्रातून आधीच होत असलेल्या विरोधाला धार येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

संबंधित बातम्या :

पाणलोट क्षेत्रात कमी पाऊस झाल्याने यंदा जिल्ह्यातील मुळा धरण 90 टक्के भरलेे. भंडारदरा व निळवंडे धरणे ओव्हर-फ्लो झाली असली, तरी नेहमीपेक्षा खूप उशिरा भरले. या धरणांत पाणीसाठा असला तरीही अहमदनगर जिल्ह्यात पहिले साडेतीन महिने दमदार पाऊस झालाच नाही. जिल्हाभरातील 71 महसूल मंडळांत पावसाचा 21 दिवसांचा खंड पडला. त्यामुळे खरीप पिकांच्या उत्पादनात 50 टक्के घट होण्याची भीती आहे.

पहिल्या साडेतीन महिन्यांत झालेल्या पावसाने नदी, ओढे, नाले न वाहिल्याने भूजलपातळी म्हणावी तशी वाढलेली नाही. सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात दमदार पाऊस झाल्याने किंचित दिलासा मिळाला. मात्र खरीप हंगामातील पिके वाया गेली. रब्बी पिके धरणांच्या पाण्यावर येतील, असा विश्वास निर्माण झाला होता. मात्र, गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने नाशिक व अहमदनगर जिल्ह्यांतून जायकवाडी धरणात 8.603 टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाने जिल्हाभरातील शेतकर्‍यांत असंतोष निर्माण होण्याची शक्यता आहे. जायकवाडी धरणात पाणी सोडण्याचे नियोजन 30 ते 31 ऑक्टोबर या दोन दिवसांत पूर्ण करण्याचे निर्देश महामंडळाने दिले आहेत. त्यामुळे अहमदनगर पाटबंधारे व मुळा पाटबंधारे विभागाकडून धावपळ सुरू झाली आहे.

SCROLL FOR NEXT