Latest

Morocco Earthquake | शक्तिशाली भूकंपाने मोरोक्को हादरले, २९६ लोकांचा मृत्यू

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन : मोरोक्को देश शक्तिशाली भूकंपाने हादरला आहे. येथे शुक्रवारी रात्री उशिरा झालेल्या शक्तिशाली भूकंपात किमान २९६ लोकांचा मृत्यू झाला, अशी माहिती देशाच्या इंटेरियर मंत्रालयाने दिली आहे. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ६.८ इतकी होती. (Morocco Earthquake)

मोरोक्कोच्या इंटेरियर मंत्रालयाने शनिवारी पहाटे सांगितले की भूकंप झालेल्या जवळच्या प्रांतांमध्ये किमान २९६ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर १५३ जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भूकंपामुळे सर्वाधिक नुकसान शहरांच्या बाहेरील भागात झाले आहे. या भूकंपामुळे नेमके किती नुकसान झाले आहे, याची माहिती अद्याप देण्यात आलेली नाही. (earthquake in morocco)

अमेरिकेच्या भूगर्भीय सर्व्हे विभागाने दिलेल्या माहितीनुसार, रात्री ११:११ वाजता झालेल्या भूकंपाची तीव्रता ६.८ इतकी होती. मोरोक्कोच्या नॅशनल सिस्मिक मॉनिटरिंग अँड अलर्ट नेटवर्कने या भूकंपाची नोंद रिश्टर स्केलवर ७ इतकी नोंदवली गेली असल्याचे म्हटले आहे. भूगर्भीय सर्व्हे विभागाने १९ मिनिटांनंतर ४.९ तीव्रतेचा धक्का बसल्याची नोंद केली.

शुक्रवारी रात्री झालेल्या भूकंपाचा केंद्रबिंदू मॅराकेचच्या दक्षिणेस सुमारे ७० किलोमीटर (४३.५ मैल) ॲटलस पर्वतावर होता. हा केंद्रबिंदू उत्तर आफ्रिकेतील सर्वात उंच शिखर तौबकल आणि प्रसिद्ध मोरोक्कन स्की रिसॉर्ट ओकेमेडेन जवळ आहे.

अमेरिकेच्या भूगर्भीय सर्व्हेकडून सांगण्यात आले आहे की भूकंपाचा केंद्रबिंदू पृथ्वीच्या पृष्ठभागापासून १८ किलोमीटर (११ मैल) खोल भूगर्भात होता, तर मोरोक्कोच्या भूकंपमापन एजन्सीने तो ८ किलोमीटर (५ मैल) खोलवर असल्याचे म्हटले आहे. (morocco earthquake today)

पोर्तुगीज इन्स्टिट्यूट फॉर सी अँड अॅटमॉस्फियर आणि अल्जेरियाच्या नागरी संरक्षण संस्थेच्या म्हणण्यानुसार, पोर्तुगाल आणि अल्जेरियापर्यंत या भूकंपाचे हादरे जाणवले. सोशल मीडियावर शेअर झालेल्या काही व्हिडिओत काही इमारत कोसळताना दिसत असून रस्त्यांवर ढिगारे पडले आहे. काही व्हिडिओत भूकंपाच्या हादऱ्यानंतर लोक सुरक्षेसाठी शॉपिंग सेंटर, रेस्टॉरंट्स आणि अपार्टमेंट इमारतींमधून बाहेर पडून धावताना दिसून आले आहेत. (Morocco Earthquake)

पीएम मोदी यांनी व्यक्त केले दुःख

मोरोक्कोमध्ये भूकंपामुळे झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले आहे. "या दु:खद प्रसंगी, माझे विचार मोरोक्कोच्या लोकांसोबत आहेत. जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत. या कठीण काळात भारत मोरोक्कोला शक्य ती सर्व मदत करेल," असे पीएम मोदी यांनी एक्सवर (ट्विटर) पोस्ट करत म्हटले आहे.

हे ही वाचा ;

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT