नाशिक जिल्ह्यात पावसाची धुवाधार बॅटिंग ! गाेदेला पूर, तिघांचा मृत्यू | पुढारी

नाशिक जिल्ह्यात पावसाची धुवाधार बॅटिंग ! गाेदेला पूर, तिघांचा मृत्यू

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी शुक्रवारी (दि. 8) पावसाने धुवाधार बॅटिंग केली. जिल्ह्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली असून, धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही त्याचा जोर अधिक आहे. गंगापूर, पालखेड, चणकापूर, पुनदसह विविध प्रकल्पांमधून नदीपात्रात मोठ्या प्रमाणात विसर्ग केला जात आहे. गंगापूरमधून ६ हजार २८२ क्यूसेक वेगाने गोदावरीच्या पात्रात पाणी सोडण्यात आले. त्यामुळे यंदाच्या हंगामात पहिल्यांदाच गोदेला पूर आला. दिंडाेरीत घराचा स्लॅब अंगावर कोसळल्याने नातू व आजोबाचा तसेच कळवणला विजेचा शॉक लागल्याने एकाचा मृत्यू झाला. तसेच पशुधन हानीही मोठ्या प्रमाणात झाली आहे.

गेल्या महिनाभरापासून दडी मारलेल्या पावसाने जिल्ह्यात जोरदार कमबॅक केले आहे. पावसाची सर्वदूर संततधार सुरू असल्याने सर्वसामान्य सुखावले आहेत. शहर व परिसराला पावसाने अक्षरश: झोडपून काढले आहे. त्यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले. शहरात दिवसभरात ६२.४ मिमी पर्जन्याची नोंद झाली. दरम्यान, त्र्यंबकेश्वर व नाशिक तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावल्याने गंगापूर धरणाच्या पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. धरणसाठा सुमारे ९३ टक्क्यांवर पोहोचल्याने शुक्रवारी (दि. 8) दुपारी एकपासून धरणातून ५०० क्यूसेक विसर्ग सुरू केला. रात्री आठपर्यंत या विसर्गात टप्प्याटप्प्याने वाढ करत तो ६,२८२ क्यूसेकपर्यंत वाढविला. त्यामुळे गोदाघाट परिसर पाण्याखाली गेला असून, काठावरील जनजीवनावर त्याचा परिणाम झाला.

रामकुंड परिसरातील दुतोंड्या मारुतीच्या कमरेला पाणी लागले असून, पूर पाहण्यासाठी नाशिककरांनी गोदाघाटावर गर्दी केली. ग्रामीण भागातही पावसाचा जोर वाढला आहे. कळवण, सुरगाणा, बागलाण तालुक्याला सर्वाधिक फटका बसला. तसेच इगतपुरी, दिंडोरीतही दिवसभर संततधार सुरूच होती. याशिवाय अन्य तालुक्यांतही हजेरीने बळीराजासह जनता सुखावली आहे. दरम्यान, सलग पावसामुळे जिल्ह्यात तिघांचा मृत्यू झाला असून, पशुधनाची हानी झाली आहे. नळवाळपाडा (ता. दिंडोरी) येथे घर कोसळून आजोबा गुलाब खरे व नातू निशांत खरे यांचा मृत्यू झाला. घराच्या ढिगाऱ्याखालून विठाबाई खरे यांना सुखरूप बाहेर काढले. रवळजी (ता. कळवण) येथे शेतात विजेची मोटर सुरू करताना शॉक लागल्याने अनिल शिवाजी चौरे यांचा मृत्यू झाला. याशिवाय कळवणच्या इंशी येथे दौलत गवळी यांची ४ बैल व १८ शेळ्या पावसामुळे मृत झाल्या. तर कळवण शहरात मोहल्ला येथे सय्यद अहमद सय्यद यांचे नदीकाठचे घर पडले. येवल्यातील पुरणगावमध्ये विजेचा शॉक लागून महादू वाघमोडे यांच्या ११ मेंढ्या गतप्राण झाल्या.

सतर्कता बाळगण्याचे आवाहन

जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही दमदार सरी बरसत आहेत. त्यामुळे धरणांमधून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग केला जात आहे. त्यामध्ये पालखेडमधून ६ हजार ७३२, कडवातून ५४७४, पुनद प्रकल्पातून १६ हजार ३८६, कडवातून ३८१४, चणकापूरमधून ३३ हजार, हरणबारीतून ५५०० व केळझरमधून ५ हजार क्यूसेक पाणी नदीपात्रात सोडले. त्यामुळे नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली. नांदूरमध्यमेश्वरमधून ११ हजार १५२ क्यूसेक वेगाने मराठवाड्याकडे पाणी झेपावते आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास विसर्गात वाढ केली जाऊ शकते. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

Back to top button