Latest

डेंग्यूचा डंख खोल ! यंदा राज्यात 2000 रुग्ण

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्यात 2021 मध्ये 12,720, तर 2022 मध्ये 8578 डेंग्यूचे रुग्ण आढळून आले. मागील वर्षीच्या तुलनेत डेंग्यू रुग्णांमध्ये 33 टक्क्यांनी घट झालेली आढळून आली आहे. राज्यात यावर्षी 2123 डेंग्यूचे रुग्ण आढळून आले आहेत. पावसाळा सुरू झाल्याने किटकजन्य आजारांच्या नियंत्रणासाठी विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत. यामध्ये किटकनाशक फवारणी, अळीनाशक फवारणी, जीवशास्त्रीय उपाययोजना करण्यात येत आहेत.

राज्यात 2021 मध्ये 2526 चिकनगुनियाचे रुग्ण आढळून आले, तर 2022 मध्ये 1087 रुग्णांची नोंद झाली. 2023 जूनअखेर 270 रुग्ण निदर्शनास आले. पालघर, कोल्हापूर, रत्नागिरी, नांदेड, अहमदनगर, सोलापूर, सातारा, पुणे, मुंबई, नाशिक, सांगली, मिरज, सोलापूर, कोल्हापूर, औरंगाबाद या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक डेंग्यू रुग्णांची नोंद झाली आहे. डेंग्यू हा विषाणूंपासून होणारा आजार आहे. त्याचा प्रसार एडिस इजिप्ती डासांमार्फत होतो. विषाणूबाधित डासाने चावा घेतल्यानंतर लक्षणे 5 ते 6 दिवसांच्या किंवा 10 दिवसांच्या काळात दिसून येतात. डेंग्यूचे निदान रक्तचाचणीद्वारे होते.

आठवड्यातून किमान एकदा घरातील पाणी भरलेली सर्व भांडी रिकामी करावी. पाणी साठवलेल्या भांड्यांना योग्य पद्धतीने व्यवस्थित झाकून ठेवावे. घरांच्या भोवताली व छतांवर वापरात नसणारे टाकावू साहित्य ठेवू नये. घराभोवतालची जागा स्वच्छ आणि कोरडी ठेवावी. लक्षणे दिसल्यास महापालिकेच्या दवाखान्यांत उपचारासाठी जावे.
             – डॉ. सूर्यकांत देवकर, सहायक आरोग्य अधिकारी, महापालिका 

हे ही वाचा :

SCROLL FOR NEXT