Latest

शिवसेनेला कोणताही धोका नाही; शिंदे गटाचे १६ आमदार अपात्र ठरण्याची शक्यता : उद्धव ठाकरे

मोहन कारंडे

पुढारी ऑनलाईन डेस्क : पक्षादेश मोडून गेलेल्यांनी पक्षावर दावा करणे चुकीच आहे. घटनातज्ञांच्या मतानुसार शिंदे गटाचे १६ आमदार अपात्र ठरण्याची शक्यता आहे. सदस्य अपात्रतेचा निर्णय आधी व्हायला हवा. सदस्य अपात्र होणार असतील तर त्यांचा दावा कसा ग्राह्य धरणार. त्यामुळे सुप्रीम कोर्टाचा निर्णय येण्याआधी निवडणूक आयोगाचा निर्णय नको, सर्वबाबी तपासल्या तर शिवसेनेला कोणताही धोका नाही, असा दावा शिवसेना पक्ष प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला. आज (दि.८) मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदे ते बोलत होते.

या वेळी उद्धव ठाकरे म्हणाले, " शिवसेनेतील फुटीवर २४ तारखेपासून सर्वोच्च न्यायालयात दररोज सुनावणी होणार आहे. शिवसेना एकच आहे आणि एकच राहणार. दुसऱ्या गटाला मी शिवसेना मानत नाही. शिवसेनेने आमचे मुद्दे निवडणूक आयोगाला लेखी स्वरूपात दिले आहेत. पक्ष जर निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींवर अवलंबून राहणार असेल तर देशातील दोन नंबरचे उद्योगपती पंतप्रधान होतील."

शिवसेनेने निवडणूक आयोगाच्या नियमानुसार घटना बनवली आहे. निवडणूक आयोगाकडे पक्षाची निवडणूक घेण्याची मागणी केली आहे; पण अद्याप उत्तर आलेलं नाही. शिवसेनेत मुख्य नेता हे पद घटनाबाह्य आहे. निवडणूक आयोगाने पदाधिकाऱ्यांची शपथपत्रे आणि सदस्यांची सख्या दाखवायला सांगितली होती. त्यानुसार शपथपत्रे सादर केली आहेत. लाखो सदस्यांचे अर्ज भरून घेतले आहेत. निवडून आलेले आमदार, खासदारच जर पक्ष आहे, असा गद्दारांचा दावा असेल आणि त्यावरूनच निर्णय द्या, असं म्हणत असतील तर हे हस्यास्पद आहे. पळपुट्यांना पक्षावर दावा सांगण्याचा अधिकार नाही. केवळ एवढ्या गोष्टींवर पक्षाच भवितव्य ठरणार असेल तर देशात लोकशाहीचा बाजार होईल, असेही उद्धव ठाकरे म्‍हणाले.

निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह आणि पक्षाच नावं यासंदर्भातील निर्णय देण्याआधी अपात्रेच्या याचिकेचा निर्णय व्हावा. आयोगाने निर्णय आधी देवू नये, असे सर्वसामान्य लोकांसह घटनातज्ञांचे मत आहे. सर्व बाबी तपासल्या तर शिवसेनेला कोणताही धोका नाही, असा विश्वास ठाकरे यांनी व्यक्त केला. या पत्रकार परिषदेला सुभाष देसाई, अनिल देसाई, अरविंद सावंत उपस्थित होते.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT