Latest

अबब.. 16 मुली, 94 तरुण, तरुणी बेपत्ता! 5 महिन्यांत ऐन उमेदीत अकोलेतून ते गेले तरी कोठे?

अमृता चौगुले

राजेंद्र जाधव

अकोले (नगर) : टीव्ही, मोबाईल अन् सोशल मीडियाच्या वाढत्या प्रभावातून 15 ते 17 वयोगटांतील अल्पवयीन मुली घर सोडून प्रियकरासोबत पळून जाण्याचे प्रमाण वाढले आहे. अकोलेतून गेल्या 5 महिन्यांत 16 पेक्षा जास्त अल्पवयीन मुली पळून गेल्या तर तरुण, तरुणींसह विवाहिता तब्बल 94 जणी बेपत्ता झाल्याची धक्कादायक माहिती अकोले व राजूर पोलिसांच्या दप्तर नोंदीतून समोर आली आहे.

मुख्यतः अकोले शहरासह आदिवासी भागात मुलींसह विवाहितांचे घर सोडण्याचे प्रमाण अक्षरशः घाबरवून टाकणारे आहे. ही चिंतेची बाब लक्षात घेवून पालकांसह शालेयस्तरावर मुला-मुलींमध्ये प्रबोधन करण्याची आवश्यकता आहे.

आदिवासी तालुका अशी अकोले तालुक्याची ओळख आहे. येथील बहुतांश लोक नोकरी व रोजगारानिमित्त मुंबई, पुणे, नारायणराव, मंचर, ओतुर परिसरात राहतात. काहींची कुटुंबे गावातचं आहेत. अंकुश ठेवणारी जबाबदार व्यक्तीचं घरी नसल्याने मुली निरनिराळ्या आमिषांना बळी पडतात. आधी मैत्री, मग गप्पा- टप्पा मग भेट वस्तु, घरामध्ये न मिळणार्‍या वस्त प्रियकराकडून मिळाल्याने त्या भारावतात. त्यांना मोबाईल सहज पुरविला जातो. हा प्रवास मैत्रीकडून तकलादू व दिखाऊ प्रेमसंबंधांकडे जातो. यामुळे घरच्या बंधनातून बाहेर पडून स्वप्नातील संसार उभा करण्याची त्यांना भुरळ घातली जाते. या मोहजाळाच्या प्रकारातून 15 अल्पवयीन मुलींसह तरुणी, विवाहित 94 बेपत्ता झाले. ही बाब चिंतीत करणारी असून, मुली बेपत्ता होण्यामागील कारणांचा शोध घेण्याची गरज आहे. विशेषतः शहरी व ग्रामीण भागातून सर्वाधिक तरुण, तरुणी, विवाहिता व अल्पवयीन मुली बेपत्ता होत असल्याची माहिती उघडकीस आली आहे.

पोलिसांच्या मिसिंग रिपोर्टनुसार, किरकोळ कारणावरून घरी वाद करुन, शौचास गेली,पण परत आलीचं नाही, असा ठळक उल्लेख असतो. या प्रकरणाचा तपास करीत असताना अनेकवेळा अडथळे येत असल्याची माहिती काही पोलिसांनी दिली. अल्पवयीन मुलीबाबत अपहरणाचा तर सज्ञान असल्यास बेपत्ता झाल्याचा गुन्हा दाखल होतो. शोध घेतल्यानंतर मात्र मुलगी स्वतःहून पळून गेल्याचे सांगते. हे पळून जाण्याचे प्रकार कुठेतरी थांबले पाहिजे. त्यासाठी पालकांसह शालेयस्तरावर मुला-मुलींमध्ये प्रबोधन करण्याची गरज निर्माण झाली आहे. आठवडा भरापुर्वी अकोलेतील एका प्रतिष्ठित कुटुंबातील मुलगा, मुलगी पळुन जाऊन लग्न करुन अकोले पोलिस स्टेशनमध्ये हजर झाले. आई- वडिलाकडून त्रास होऊ नये म्हणून त्यांनी पोलिसांची मदत घेतली. आदिवासी भागातील अल्पवयीन मुली मुलांसोबत पळुन जाऊन मंदिरात विवाह करण्याचे दिवसेंदिवस प्रमाण वाढत आहे.

मुलीची नंतर होते वाताहत..!

पळून गेलेल्या मुलींसह कुटुंबाचेही आयुष्य बरबाद होत असल्याचे विदारक चित्र दिसत आहे. मुलीचे अपहरण झाल्याची नोंद पोलिसांत झाल्यास अल्पवयीन असल्याने तिने घरातून पळून जाऊन केलेला विवाह बेकायदेशीर ठरतो. मग तिची रवानगी सुधारगृहात तर तरुणास जेलची हवी खावी लागते.

पालकांच्या पदरी पडतो मनःस्ताप!

ज्यांनी 15-16 वर्षे हाता- खांद्यावर वाढविले, काबाड कष्ट करून शिक्षण पूर्ण केले. तळहातावरच्या फोडाप्रमाणे सांभाळणार्‍या आई- वडिलांपेक्षा प्रियकर त्यांना महत्त्वाचा वाटतो. काम अन् कमाईच्या चक्रात अडकलेले आई-वडील मुलींनी दिलेल्या या अनपेक्षित धक्क्याने अक्षरशः कोलमडतात. पोलिसांत दाद मागतात; परंतु अब्रू जाते अन् मनःस्ताप पदरी पडतो.

महाराष्ट्रातून पाच-सहा महिन्यांमध्ये महिला व मुलींचे बेपत्ता होण्याचे प्रमाण धक्कादायक आहे. अकोल्यात हे प्रमाण वाढत आहे. विशेषतः महाविद्यालयीन मुली व मध्यमवयीन महिलांमध्ये हे प्रमाण जास्त आहे, ही बाब अतिशय चिंताजनक आहे. याबाबत राज्य महिला आयोगाने सरकारला सूचना केल्या आहेत. विशेषतः गृह विभागाकडे याची मोठी जबाबदारी आहे, पण कौटुंबिक व समाज पातळीवर आपण मुले-मुलांशी संवाद वाढवणे गरजेचे वाटते. अशा केसेसमध्ये मुली स्वतःहून घर सोडून जाण्याचे प्रमाण लक्षणीय आहे. मुला-मुलींशी बोलणं व त्यांना योग्य मार्गदर्शन होणं गरजेचे आहे. यावर पोलिस, जिल्हा महिला व बाल कल्याण विभाग, राज्य महिला आयोग अधिक सजगपणे काम करीत आहे.
उत्कर्षा रूपवते, सदस्या – महाराष्ट्र राज्य महिला आयोग

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT