Latest

Salmonellosis : किंडर चॉकलेटमधून मुलांना साल्मोनेलोसिस बॅक्टेरियाची लागण, ११ देशांत फैलाव, काय आहेत लक्षणे?

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन डेस्क

बेल्जियममध्ये तयार होत असलेल्या लोकप्रिय किंडर (Kinder) चॉकलेटमधून (Kinder) साल्मोनेलोसिस (salmonellosis) जीवाणूचे संक्रमण झाल्याची १५० हून अधिक प्रकरणे ११ युरोपीय देशांत आढळून आली आहेत. याबाबतची माहिती जागतिक आरोग्य संघटनेने दिली आहे. साल्मोनेलोसिस हा साल्मोनेला (salmonella) या जीवाणूमुळे होत असलेला एक आतड्यांसंबंधी रोग आहे. या रोगाचा प्रादुर्भाव युरोप आणि अमेरिकेत अधिक दिसून येत आहे. याचा मुले आणि वृद्ध व्यक्तींना डिहायड्रेशनशी संबंधित गंभीर गुंतागुंत होऊन धोका होऊ शकतो, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.

दरम्यान, WHO ने म्हटले आहे की ब्रिटनने एक महिन्यापूर्वीच या चॉकलेटमध्ये साल्मोनेलाचे जीवाणू आढळून आल्याचे सांगत सतर्क केले होते. या जीवाणूचे संक्रमण झाल्याची प्रकरणे बेल्जियम ते अमेरिकेपर्यंत आढळून आली आहेत. साल्मोनेला जीवाणू संक्रमणाच्या वाढत्या प्रकरणांमुळे जगभरातून Kinder चॉकलेटची विक्री थांबवण्यात आली आहे. या जीवाणूमुळे १० वर्षाहून कमी वयाची मुले संक्रमित होत आहेत. तर एकूण संक्रमित प्रकरणांमध्ये मुलांचे प्रमाण ८९ टक्के आहे. मात्र या संक्रमणामुळे कोणाचाही मृत्यू झाल्याचे वृत्त नाही.

अन्न संक्रमणास कारणीभूत असलेला साल्मोनेला जीवाणू जेनेटिक चाचणीमध्ये आढळून आला आहे. हा रोग बेल्जियममधून आला आहे. WHO ने म्हटले आहे की संक्रमण काळात युरोप आणि जगभरातील किमान ११३ देशांमध्ये किंडर चॉकलेट उत्पादने पोहोचली आहेत. साल्मोनेला जीवाणूच्या सध्याच्या संसर्गाच्या जी प्रकरणे आहेत त्याच्याशी मिळतीजुळती प्रकरणे बेल्जियममध्ये गेल्या डिसेंबर आणि जानेवारीत नोंदवली गेली होती. बेल्जियममधील अरलॉन शहरातील बटर मिल्क फॅक्टरीत याचे संक्रमण आढळून आले होते. ही फॅक्टरी एप्रिलच्या सुरुवातीला बंद करण्याचे आदेश देण्यात आले होते.

जागतिक आरोग्य संघटनेने एका निवेदनात म्हटले आहे की संसर्गास कारणीभूत असलेल्या साल्मोनेला (Salmonellosis) जीवाणूचा हा प्रकार सहा प्रकारच्या प्रतिजैविकांना प्रतिकार करतो. याचाच अर्थ असा की औषधांचा त्यावर परिणाम होत नाही.

मुले आणि वृद्ध लोकांना धोका अधिक

साल्मोनेलोसिसची लक्षणे सौम्य असतात आणि बहुतेक प्रकरणांमध्ये रुग्ण काही विशिष्ट उपचारांनी संसर्गातून बरे होतात. पण मुले आणि वृद्ध लोकांना याचा जास्त धोका आहे. जेव्हा शरिरातील पाणी कमी होते तेव्हा हा रोग अधिक गंभीर स्वरूप धारण करू शकतो आणि तो जीवघेणा ठरू शकतो.

११ देशांमध्ये संसर्ग पसरला

जागतिक आरोग्य संघटनेने निवेदनात नमूद केले आहे की ज्या ११ देशांमध्ये संसर्गाची पुष्टी झाली आहे त्यात बेल्जियम (२६), फ्रान्स (२५), जर्मनी (१०), आयर्लंड (१५), लक्झेंबर्ग (१), नेदरलँड (२), नॉर्वे (१), स्पेन (१), स्वीडन (४), ब्रिटन (६५) आणि अमेरिकेतील एका प्रकरणाचा समावेश आहे.

लक्षणे काय?

साल्मोनेलोसिसच्या संसर्गामुळे ताप, पोटात दुखणे, मळमळ, उलट्या आणि अतिसार यांसारखी लक्षणे दिसू शकतात. ही लक्षणे संक्रमित अन्नपदार्थ खाल्ल्यानंतर ६ ते ७२ तासांनी जाणवू लागतात आणि साल्मोनेलामुळे संक्रमित झालेले पाणी आणि त्यामुळे उद्भवलेला आजार २ ते ७ दिवस राहू शकतो.

मानवांमध्ये कसा पसरतो?

साल्मोनेला जीवाणू कोंबड्या, बदके, डुक्कर यांच्यासह अन्य पाळीव प्राणी आणि वन्य प्राण्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर आढळून येतो. साल्मोनेला जीवाणू मुख्यतः अंडी, मांस, कुक्कुटपालन आणि दुग्धजन्य पदार्थांसह संक्रमित अन्न खाल्ल्याने मानवांमध्ये पसरतो.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT