Latest

दहावी, बारावी परीक्षा शुल्कात १२ टक्क्यांनी वाढ

दिनेश चोरगे

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा शुल्कात सुमारे १२ टक्के वाढ केली आहे. आता दहावीसाठी ४२० रुपयांऐवजी ४७० रुपये तर बारावीसाठी ४४० रुपयांऐवजी ४९० रुपये भरावे लागणार आहेत. या परीक्षा शुल्कासोबतच विद्यार्थ्यांना प्रशासकीय शुल्क, गुणपत्रिका शुल्क, प्रमाणपत्र शुल्क, प्रात्यक्षिक परीक्षा शुल्क यासाठीही काही रक्कम भरावी लागणार आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून राज्यात दरवर्षी फेब्रुवारी/मार्च महिन्यात दहावी, बारावीच्या परीक्षा घेण्यात येतात. अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी जुलै/आॅगस्ट महिन्यातही या परीक्षांचे आयोजन करण्यात येते. गतवर्षी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी, बारावीच्या परीक्षा शुल्कात १० टक्के वाढ केली होती. त्यानंतर आता बोर्डाने पुन्हा एकदा परीक्षा शुल्क वाढीचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने राज्यातील सर्व विभागीय सचिवांना या सुधारित परीक्षा शुल्काबाबत कळविले आहे. सुधारित शुल्क आपल्या स्तरावरुन सर्व शाळा, महाविद्यालयांना अवगत करावे आणि मंडळाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करावे, असे राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी या पत्रात म्हटले आहे.

पुरवणी परीक्षेपासूनच अमलबजावणी

दहावी, बारावीचे वाढीव परीक्षा शुल्क जुलै/आॅगस्ट २०२४ मध्ये होणाऱ्या परीक्षांपासूनच लागू असणार आहे. शासन आदेश आणि कार्यकारी परिषद सभेतील निर्णयाच्या अनुषंगाने माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र पुरवणी परीक्षा जुलै-आॅगस्ट २०२४ व मुख्य परीक्षा २०२५ साठी हे सुधारित परीक्षा शुल्क लागू असेल, असे राज्य मंडळाने आपल्या पत्रात म्हटले आहे.

अध्यक्ष म्हणाले, तुम्ही शिक्षकांनाच विचारा

राज्य मंडळाने दहावी, बारावीच्या परीक्षा शुल्क वाढीबाबत विभागीय मंडळांना पत्र पाठविले आहे. या वाढीबद्दल राज्य मंडळाच्या कार्यालयात विचारणा केली असता सचिव अनुराधा ओक सुट्टीवर असल्याचे सांगण्यात आले. तर मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी तुम्ही शिक्षकांनाच विचारा, असे म्हणून याविषयावर बोलणे टाळले. छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय मंडळात विचारणा केली असता, परीक्षा शुल्क वाढीचे पत्र आले आहे, मात्र, राज्य मंडळाकडून त्याबाबत नव्याने कार्यवाही सुरू आहे, असे सांगण्यात आले.

दहावी परीक्षेचे शुल्क असे

दहावीसाठी परीक्षा शुल्क ४७० रुपये, प्रशासकीय शुल्क २० रुपये, गुणपत्रिका शुल्क २० रुपये, प्रमाणपत्र शुल्क २० रुपये, प्रात्यक्षिक परीक्षा शुल्क ११० रुपये असे असणार आहे. बारावीसाठी हे परीक्षा शुल्क ४९० रुपये, प्रशासकीय शुल्क २० रुपये, गुणपत्रिका २० रुपये, प्रमाणपत्र शुल्क २० रुपये, प्रात्यक्षिक परीक्षा शुल्क प्रति विषय १५ रुपये, माहिती तंत्रज्ञान विषय शुल्क प्रति विषय २०० रुपये, असे शुल्क आकारले जाणार आहे.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT