Latest

पुढारी इफेक्ट I खिद्रापूर कोपेश्वर मंदिरासाठी ११० कोटींचा निधी देणार : राजेंद्र पाटील-यड्रावकर

निलेश पोतदार

कुरुंदवाड; पुढारी वृत्तसेवा : खिद्रापूर (ता.शिरोळ) कोपेश्वर मंदिराची पुरातत्व विभागाच्या सल्ल्यानुसार तत्काळ दुरुस्तीला सुरवात करणार असून, ११०कोटींचा निधी देणार असल्याची घोषणा आरोग्य राज्यमंत्री डॉ.राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी केली.

दैनिक पुढारीने गेल्या दोन दिवसांपासून शिल्पवैभव संकटात खिद्रापूर कोपेश्वर मंदिराला तडे; अद्भुत स्वर्गमंडप कोसळण्याची भीती. खजुराहोच्या धर्तीवर व्हावी कोपेश्वर मंदिराची दुरुस्ती अशी वृत्तमालिका प्रसिद्ध करत कोपेश्वर मंदिराची विदारक परिस्थिती उघडकीस आणली. या वृत्‍तानंतर खळबळ माजली होती. शासकीय स्तरावर याची गंभीर दखल घेत राज्यमंत्री डॉ.राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी खिद्रापूर मंदिराची पाहणी करत निधीबाबत घोषणा केली.

खिद्रापूर कोपेश्वर मंदिराची आज (रविवार) सकाळी 10 वाजता राज्यमंत्री डॉक्टर पाटील-यड्रावकर यांनी पाहणी केली. यावेळी दैनिक पुढारीशी बोलताना ते म्हणाले की, खिद्रापूर कोपेश्वर मंदिरासाठी यापूर्वी साडेबारा कोटीच्या निधीची तरतूद केली होती. मंदिराच्या दुरुस्तीसाठी शनिवारी संध्याकाळी जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांच्या अध्यक्षतेखाली झालेली बैठकीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट्सचे मुख्य सभापती शिखा जैन, किरण कलमदानी यांनी दुरुस्तीचा आराखडा तयार केला असून, यासाठी ११० कोटींच्या निधीची आवश्यकता असल्याचे सांगितले आहे.

यापूर्वी ११ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून आणखी अपेक्षित असलेल्या १०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देऊन शिल्प वैभवाची लवकरच दुरुस्ती करून घेणार असल्याचे त्‍यांनी सांगितले.

यावेळी सरपंच हैदरखान मोकाशी, दयानंद खानोरे, जब्बार मोकाशी यांनी मंदिराची विदारक परिस्थितीची माहिती दिली. यावेळी पोलीस पाटील दिपाली पाटील, सचिन पाटील, हिदायत मुजावर, अमजद मोकाशी आदी उपस्थित होते.

SCROLL FOR NEXT