Latest

Fake Blood Platelets : प्रयागराजमध्ये ‘ब्लड प्लेटलेट्स’ ऐवजी चढवलं ‘मोसंबी ज्यूस’; रुग्णाचा मृत्यू, १० जणांना अटक

अमृता चौगुले

लखनऊ; पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रयागराजमध्ये बनावट ब्लड प्लेटलेट्स विकल्याप्रकरणी यूपी पोलिसांनी 10 आरोपींना अटक केली आहे. प्रयागराजमध्ये डेंग्यूच्या रुग्णाला प्लेटलेट्स म्हणून मोसंबीचा ज्यूस दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. मात्र, मोसंबी ज्यूसचे आरोप अद्याप सिद्ध झाले नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. अटक करण्यात आलेले आरोपी रक्त प्लाझ्माला प्लेटलेट्स म्हणून विकत होते. (Fake Blood Platelets)

प्रयागराजचे पोलिस अधीक्षकांनी सांगितले की, प्रयागराजमधील या गुन्ह्यासंबधीत आरोपींची टोळी प्लेटलेट्स म्हणून मौसबीचा ज्यूस म्हणून विकत होती का? याबाबतची अटक करण्यात आलेल्या आरोपींची चौकशी करण्यात आली आहे. तर याबाबत यातील एका आरोपीने आम्ही रक्ताचा प्लाझ्मा प्लेटलेट्स म्हणून विकतो असे सांगितले. प्लेटलेट्स हे मोसंबी ज्यूस असल्याचे कथितपणे सांगितल्याप्रकरणी तपास अहवालाची प्रतीक्षा करण्यात येत असल्याची माहिती पोलिस अधीक्षकांनी यावेळी दिली. (Fake Blood Platelets)

उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये रक्तातील प्लेटलेट्सऐवजी मोसंबीचा रस दिल्याने डेंग्यूच्या रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप आहे. हे खळबळजनक प्रकरण प्रयागराजच्या झालवा भागातील आहे. प्रदीपकुमार पांडे यांना डेंग्यूमुळे खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. रुग्णाला प्लेटलेट्सऐवजी मोसंबीचा ज्यूस देण्यात आल्याचा आरोप आहे, त्यामुळे त्याचा जीव गेला. हे प्रकरण सोशल मीडियावर आल्यानंतर प्रशासनाने रुग्णालयाला सील ठोकले आहे. पोलिसांचे म्हणणे आहे की आरोपी रक्तपेढ्यांमधून प्लाझ्मा घेत होते आणि प्लेटलेट्सच्या स्वरूपात ते पुन्हा पॅक करत होते. (Fake Blood Platelets)

वरिष्ठ पोलिस अधीक्षक शैलेश कुमार पांडे यांनी पत्रकारांना सांगितले की, खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी बनावट प्लेटलेट्चा पुरवठा करणाऱ्या 10 जणांना अटक केली. पोलिसांनी त्यांच्याकडून प्लेटलेट्चे अनेक पाऊच जप्त केले आहेत. अटक केलेल्या लोकांच्या चौकशीत हे लोक रक्तपेढीतून प्लाझ्मा घेऊन वेगवेगळ्या पाऊचमध्ये टाकायचे आणि पाऊचवर प्लेटलेट्सचे बनावट स्टिकर लावून गरजू लोकांना विकायचे, असे त्यांनी सांगितले.(Fake Blood Platelets)

चौकशीत जे तथ्य समोर आले आहे, त्याचा पुढील तपास केला जाईल, असे पांडे यांनी सांगितले. यापूर्वी काही दिवसांपूर्वी बेकायदेशीरपणे रक्तपुरवठा करणाऱ्या १२ जणांना अटक करण्यात आली होती.

रुग्णाला प्लेटलेट्सच्या पाऊचमध्ये मोसंबीचा ज्यूस दिल्याच्या प्रकरणाबाबत विचारले असता ते म्हणाले की, चौकशीत पाऊचमध्ये मोसंबीचा रस असल्याची बाब अद्याप समोर आलेली नाही आणि हे लोक प्लेटलेट्स ऐवजी प्लाझ्मा विकतात. नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आले असून त्याची तपासणी केल्यानंतरच चित्र स्पष्ट समोर येईल, असे पांडे यांनी सांगितले.

जिल्ह्यातील एका खासगी रुग्णालयात डेंग्यूच्या रुग्णाला प्लेटलेट्सऐवजी मोसंबीचा रस दिल्याचा प्रकार गुरुवारी उघडकीस आला. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर उपमुख्यमंत्री ब्रिजेश पाठक यांच्या आदेशानुसार रुग्णाला प्लेटलेट्सऐवजी मोसंबी ज्यूस दिल्याचा आरोप असलेल्या रुग्णालयाला सील करण्यात आले.

अधिक वाचा :

SCROLL FOR NEXT