Latest

सणसरमधील शेतकर्‍याची १ कोटी 13 लाखांची फसवणूक

अमृता चौगुले

बारामती : पुढारी वृत्तसेवा : अडीचशे वर्षांपूर्वीच्या जुन्या काशाच्या भांड्याची विक्री करून त्याद्वारे 200 कोटी रुपये मिळवून देण्याचे आमिष दाखवत चौघांनी एकाची 1 कोटी 13 लाख रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी रफिक इस्माईल तांबोळी (रा. लोहगाव, पुणे), सिराज शेख ऊर्फ पानसरे (रा. कोंढवा), उमेश उमापुरे (रा. कासारशिरसी, ता. निलंगा, जि. लातूर) व धनाजी पाटील (रा. सांगली) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत राजेंद्र बापूराव शेलार (रा. सणसर, ता. इंदापूर) यांनी बारामती शहर पोलिस ठाण्यात
फिर्याद दिली.

रफिक तांबोळी याच्याशी 2014 ते 2016 च्या दरम्यान फिर्यादीची ओळख झाली. त्यावेळी त्याने आळंदी येथील लिटिगेशनचा प्लॉट असून, तो क्लीअर करण्यासाठी पैशाची आवश्यकता असल्याचे सांगितले. प्लॉटची विक्री झाल्यावर 50 कोटी रुपये मिळणार आहेत. त्यातील 4 कोटी रुपये देतो, असे आमिष त्याने दाखवले. त्यामुळे फिर्यादीने त्याला 1 लाख रुपये रोख दिले. 15 दिवसांनंतर तांबोळी याने पुन्हा पैशाची मागणी केली. त्यावेळी त्याला 2 लाख रुपयांची मदत करण्यात आली. चार कोटींचे आमिष दाखवत त्याने पुन्हा पैशाची मागणी केल्यावर शेलार यांनी त्याच्या खात्यावर 4 लाख 65 हजार रुपये भरले. त्यानंतरही रफिक व त्याची पत्नी आतिया या दोघांच्या खात्यावर 12 ते 17 लाख रुपये भरण्यात आले.

2017 मध्ये फिर्यादीने पैसे परत मागितले असता त्याने माझ्याकडे काशाचे भांडे असून, ते 250 वर्षांपूर्वीचे आहे. त्यात वीज पडून इलेक्ट्रिक पॉवर तयार झाली आहे. हे भांडे नासा, इस्रोसारख्या संस्था विकत घेतात. ही रक्कम 200 ते 300 कोटी असेल. परंतु, त्यात किती पॉवर निर्माण झाली आहे, याची पडताळणी करण्यासाठी मला फी भरावी लागेल. सध्या माझ्याकडे पैसे नाहीत. तुम्ही मदत करा, असे सांगितले. त्याला भुलून फिर्यादीने सणसर येथील गट क्र. 63 मधील 90 गुंठे जमीन विकत त्याला 90 लाख रुपये दिले. त्यानंतर तो मोबाईल बंद करून पसार झाला.

रफिक याचा शोध घेत असतानाच फिर्यादीची शेख व उमापुरे यांच्याशी भेट झाली. फिर्यादी आर्थिक अडचणीत आल्याचा फायदा घेत दोघांनीही काशाच्या भांड्याची कल्पना पुन्हा त्यांच्या डोक्यात उतरवली. त्यामुळे फिर्यादीने पुन्हा जमीन गहाण ठेवत वेळोवेळी 17 लाख रुपये रोख व उमापुरे याच्या खात्यावर 1 लाख 11 हजार रुपयांची रक्कम भरली. धनाजी पाटील यानेसुद्धा याच पद्धतीने फिर्?ादीला आमिष दाखवत 3 लाख 80 हजार रुपये खात्यावर भरण्यास भाग पाडले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT