पुढारी ऑनलाईन डेस्क : अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) शुक्रवारी (दि.११) 'जमिनीच्या मोबदल्यात रेल्वेमध्ये नोकरी' घोटाळा प्रकरणी लालू प्रसाद यादव यांच्या अनेक नातेवाइकांच्या दिल्ली आणि बिहार येथील ठिकाणी छापे टाकले. लालू प्रसाद यांची कन्या मीसा भारती यांच्या दिल्लीतील तसेच राजदचे नेते आणि बिहारमधील माजी आमदार अबू दोजाना यांच्या घरावर छापे टाकण्यात आले. या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री आणि माजी रेल्वे मंत्री लालू प्रसाद यादव यांनी एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन भाजप आमच्याशी राजकीय लढाई लढणार का? असे ट्विट करत भाजपवर निशाणा साधला आहे. (Lalu Prasad Yadav)
लालू प्रसाद यादव यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरुन ट्विट करत भाजपावर निशाणा साधला आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, आणीबाणीचा काळोखही आपण पाहिला आहे. ती लढाईही आम्ही लढलो. आज माझ्या मुली, नातवंड आणि गर्भवती सून यांना ईडीने बिनबुडाच्या बदनामीच्या प्रकरणात १५ तास बसवून ठेवले आहे. एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन भाजप आमच्याशी राजकीय लढाई लढणार का? संघ आणि भाजपविरुद्ध माझा वैचारिक लढा आहे आणि राहील. मी त्यांच्यापुढे कधीही झुकलो नाही आणि तुमच्या राजकारणापुढे माझ्या कुटुंबातील आणि पक्षातील कोणीही झुकणार नाही.
एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, लालू प्रसाद आणि त्यांच्या कुटुंबातील काही सदस्यांनी 2004 ते 2009 या काळात ते रेल्वेमंत्री असताना भारतीय रेल्वेत नोकरीच्या मोबदल्यात लाच म्हणून स्वस्तात भूखंड मिळवल्याचा आरोप सीबीआयने केला आहे. तपासासंदर्भात गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये एजन्सीने जवळपास दोन डझन ठिकाणी शोधही घेतला होता.
हेही वाचा