नगर : प्रवीण घुलेंसह अनेकांचा आज भाजपमध्ये प्रवेश ; फडणवीसांच्या उपस्थितीत होणार शेतकरी मेळावा | पुढारी

नगर : प्रवीण घुलेंसह अनेकांचा आज भाजपमध्ये प्रवेश ; फडणवीसांच्या उपस्थितीत होणार शेतकरी मेळावा

कर्जत :  पुढारी वृत्तसेवा : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज (दि.11) कर्जत तालुक्याच्या दौर्‍यावर येत आहेत. दुपारी एक वाजता त्यांच्या उपस्थितीत शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला आहे. यावेळी अनेक नेते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्यामुळे या मेळाव्याविषयी मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. उपमुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस प्रथमच नगर जिल्ह्याच्या दौर्‍यावर येत आहेत. कर्जत येथे त्यांच्या उपस्थितीमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह काही मंत्री व आमदार उपस्थित राहणार आहे,अशी माहिती माजी मंत्री, आमदार प्रा, राम शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

दुपारी फडणवीस यांचे हेलिकॅप्टरने कर्जतमध्ये आगमन होईल. यानंतर ते ग्रामदैवत गोधड महाराज मंदिरात जाऊन दर्शन घेतील. नंतर कर्जत येथील पोलिस हाऊसिंग कार्पोरेशन अंतर्गत निवासी संकुलाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होईल. यानंतर दादा पाटील महाविद्यालयासमोरील मैदानात शेतकरी मेळावा होईल. याच ठिकाणाहून तालुक्यातील सिद्धटेकेतील 400 केव्ही क्षमतेचे वीज उपकेंद्र व जामखेड येथील पोलिस हाउसिंग कारपोरेशनअंतर्गत निवासी संकुलाचे उद्घाटन करण्यात येणार आहे.

फडणवीस यांच्या दौर्‍यात महाविकास आघाडीला धक्का बसणार आहे. काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण घुले यांच्यासह त्यांचे हजारो कार्यकर्ते भाजपमध्ये यावेळी प्रवेश करणार आहेत. काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष घुले सध्या पैठण वारीमध्ये आहेत. ग्रामदैवत गोधड महाराज पायी दिंडी पैठणकडे मार्गस्थ झाली आहे. या दिंडीत घुले सहभागी आहेत. वारीमधून ते थेट कार्यक्रमस्थळी येणारा आहेत.

आमदार शिंदेंना पक्षाकडून ताकद
कर्जत जामखेड मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला आहे. आमदार रोहित पवार यांनी या बालेकिल्ल्याला सुरुंग लावला. मात्र, हा बालेकिल्ला पुन्हा खेचून आणण्यासाठी उपमुख्यमंत्री फडणवीस आमदार शिंदे यांना ताकद देत आहेत.

Back to top button