कासव 
Latest

ऑलिव्ह रिडले, ग्रीन टर्टेल, हॉक्सबिल या दुर्मिळ प्रजातींना विणीच्या हंगामासाठी भावली सिंधुदुर्गची किनारपट्टी

backup backup

पुढारी वृत्तसेवा, ठाणे : विश्वनाथ नवलू, ऑलिव्ह रिडले जातीची कासवे हा सागरी अन्नसाखळीतील महत्त्वाचा घटक. अनेक कारणांमुळे ही कासवे दुर्मीळ होत चालली असल्याचे लक्षात घेऊन काही सजग नागरिकांनी त्यांच्या संवर्धनाचा उपक्रम राबवायला सुरुवात केली. ही कासवे सिंधुदुर्ग जिल्ह्यात वन्यजीव संरक्षक टीमचे तज्ज्ञ अभ्यासक प्रा. नागेश दप्तरदार यांच्या मार्गदर्शनाखाली मिठबाव-तांबळडेग येथील सागर मालडकर मित्रमंडळी तसेच वेंगुर्ले-वायंगणी समुद्रकिनाऱ्यावर सुहास तोरसकर मित्रमंडळी संवर्धन मोहीम राबवत आहेत. त्यामुळे ऑलिव्ह रिडले, ग्रीन टर्टेल, हॉक्सबिल, लॉगर हेड, ग्रीन सी टर्टल दुर्मिळ प्रजातींसाठी सिंधुदुर्ग हॉटस्पॉट बनला आहे.

सागरी कासवांच्या सात प्रजातींपैकी पाच भारतात आढळतात. त्यापैकी "ऑलिव्ह रिडले' ही प्रजाती कोकण किनारी आढळते. या प्रजातीतील कासवे दुर्मीळ होऊ लागल्याने तिच्या बचावासाठी आता अनेक जण पुढे येत आहेत. सिंधुदुर्ग किनाऱ्यावरून संवर्धन केंद्रांमधून दरवर्षी १० ते १५ हजार कासवांची पिल्ले समुद्रात सोडली जातात. तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील वेळास येथेही गेली काही वर्षे कासव संवर्धनाचे काम सुरू आहे. वातावरणात होणाऱ्या बदलाच्या किंवा आपत्तीच्या काळात सुरक्षित किनारा म्हणून या दुर्मीळ कासवांनीही सिंधुदुर्ग किनाऱ्याला पसंती दिली असून थंडी सुरू झाल्यानंतर नोव्हेंबरमध्ये ही कासवे समुद्र किनाऱ्यावर अंडी घालण्यासाठी येतात, मार्च- एप्रिलपर्यंत हा विणीचा हंगाम चालतो.

कासवांच्या संवर्धनामुळे समुद्री जैवविविधता संतुलन, पर्यावरण चांगल राहिलं हेही आता नागरिकांना कळून आले आहे. मात्र ठराविक कम्युनिटीच उदाहरणार्थ मच्छीमार बांधवच पुढे आलेले दिसत आहेत. यापुढे तरं कासव संवर्धनासाठी सर्वच नागरिकांनी पुढे येणे गरजेचे आहे. वातावरणातील बदल म्हणा किंवा सतत येणारी समुद्री वादळे यांमुळे हे वन्यजीव धोक्यात आले आहेत. कोकणातील ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग व रत्नागिरी किनारपट्टीवर जेलिफिशचा उपद्रव वाढलेला आहे. त्यामुळे मच्छीमार बांधव त्रस्त आहेत. परंतु कासव हे जेलिफिशवर नियंत्रण ठेवतात हे स्थानिक मच्छीमारांना समजून आल्याने किनाऱ्यावर जेथे जेथे कासवांनी अंडी घातलेली घरटी दिसतील, त्याठिकाणी कासव संवर्धन केंद्र उभे राहत आहे.

कोकणात कासवांवर संशोधन अभ्यासाकरिता २५ जानेवारी २०२२ रोजी मध्यरात्री दोन कासवांना सॅटलाईट ट्रान्समीटर लावून त्यांना पुन्हा समुद्रात सोडण्यात आले. भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर प्रथमच समुद्री कासवांना सॅटलाईट ट्रान्समीटर लावून त्यांचा स्थलांतराचा अभ्यास करण्यात येत आहे. दरवर्षी नोव्हेंबर ते मार्च महिन्यादरम्यान ऑलिव्ह रिडले प्रजातीची मादी कासवे कोकण किनारपट्टीवर अंडी घालण्यासाठी येतात. पहिल्या टप्प्यात पाच मादी कासवाच्या पाठीवर सॅटलाईट ट्रान्समीटर लावला जाणार आहे.

मोठ्या माशांच्या हल्ल्यात, बोटींच्या पंख्यामुळे तसेच मच्छीमारी जाळ्यांत अडकून जखमी झालेली कासवे सर्रास आढळून येत आहेत. यांच्यावर उपचार करण्यासाठी करण्यासाठी आता सिंधुदुर्गात तळाशी येथे उपचार केंद्र उभे राहत असून तज्ज्ञ डॉक्टरांचीही नियुक्ती करण्यात आली आहे.

– प्रा. नागेश दप्तरदार, तज्ज्ञ अभ्यासक, वन्यजीव संरक्षक टीम, सिंधुदुर्ग

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT