कोलकाता; वृत्तसंस्था : वेंकटेश अय्यरच्या 42 चेंडूंतील 57 धावांच्या खेळीच्या बळावर केकेआरने राजस्थान रॉयल्सविरुद्ध आयपीएल साखळी सामन्यात 20 षटकांत 8 बाद 149 धावांची किरकोळ मजल गाठली. 57 धावा जमवणार्या वेंकटेश अय्यरच्या खेळीत 2 चौकार, 4 षटकारांचा समावेश राहिला. मात्र, त्याला एकाही फलंदाजाची समयोचित साथ लाभली नाही. कर्णधार नितीश राणाने 22 धावा केल्या तर गुरबाझने 18 धावांचे योगदान दिले. राजस्थानतर्फे यजुवेंद्र चहलने 25 धावांत 4 बळी घेतले. (KKR vs RR)
या लढतीत राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकल्यानंतर केकेआरला प्रथम फलंदाजीला पाचारण केले तर ठराविक अंतराने केकेआरचे गडी बाद होत राहिल्याने हा निर्णय सार्थही ठरला. जेसन रॉय (10) व गुरबाझ (18) हे दोन्ही सलामीवीर अतिशय स्वस्तात बाद झाल्याने एकवेळ त्यांची स्थिती 2 बाद 29 अशी झाली. त्यानंतर अय्यरने कर्णधार नितीश राणाच्या साथीने तिसर्या गड्यासाठी 48 धावा जोडल्या. राणा तिसर्या गड्याच्या रूपाने बाद झाला, त्यावेळी केकेआरने 10.2 षटकात 77 धावांपर्यंत मजल मारली होती. (KKR vs RR)
आंद्रे रसेल व रिंकू सिंग हे आश्वासक फलंदाजदेखील स्वस्तात बाद झाल्याने केकेआरला आणखी धक्के बसले. रसेल 10 तर रिंकू 16 धावांवर परतला. चहलने शार्दुलला पायचित केले तर सुनील नरेन संदीप शर्माच्या डावातील शेवटच्या चेंडूवर लाँगऑफवरील रुटकडे झेल देत परतला.
हेही वाचा;