राजू शेट्टी 
Latest

उसाच्या एकरकमी एफआरपीसाठी संघर्षाची तयारी ठेवा : राजू शेट्टी

अमृता चौगुले

सरुड (कोल्‍हापूर), पुढारी वृत्तसेवा : उसाची एकरकमी एफआरपी मिळविण्यासाठी शेतकऱ्यांनी रस्त्यावरच्या लढ्यासाठी सज्ज राहावे, असे आवाहन मा. खा. राजू शेट्टी यांनी केले. इथेनॉल, कच्ची साखर तसेच उपपदार्थ निर्मितीतून साखर कारखान्यांना अधिकचे उत्पन्न मिळते. तरीही ऊस उत्पादक शेतकरी हक्काच्या ऊसदरापासून अद्याप दूर राहत आल्याची खंत व्यक्त करीत व्यापक जनजागृतीतून सरकार आणि कारखानदार विरोधातील शेतकऱ्यांचा लढा अधिक तीव्र करण्याचे संकेतही यावेळी राजू शेट्टी यांनी दिले. गणेशोत्सवाच्या निमित्ताने शेतकरी, तरुण मंडळांना शुभेच्छा भेट देण्यासाठी खा. राजू शेट्टी शाहूवाडी तालुक्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी सरुड येथे त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला.

खा. शेट्टी म्हणाले, शेतकरी चळवळीत स्वाभिमानीची धार कमी झाल्याचा आभास निर्माण केला जात आहे. परंतु शेतकऱ्यांच्या न्याय हक्कांसाठी स्वाभिमानीचा आवाज अद्यापही बुलंद आहे. साखर कारखानदारी अडचणीत असल्याचे भासवून ऊसाच्या एफआरपीचे तुकडे करणाऱ्या कारखानदारांनी शेतकऱ्यांचा छळवाद सुरू केला आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न पूर्वीच्या तुलनेत तिथेच राहिले आहे. याउलट उसाच्या रसासह मोलॅसिस पासून इथेनॉल निर्मिती तसेच कच्ची साखर उत्पादनातून कारखान्यांचा उत्पन्न स्रोत वाढला आहे. कारखानदारांकडे याचा हिशोब मागण्याची गरज आहे. साखरेला बाजारपेठेत चांगला भाव मिळण्याची संधी उपलब्ध आहे, मात्र सरकारचे चुकीचे धोरण अडथळा ठरत असल्याचे शेट्टी यांनी सांगितले.

शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करावा, यासाठी सरकार दरबारी पाठपुरावा सुरू असून त्यासाठी न्यायालयात याचिका दाखल करण्याची तयारी सुरू आहे. यावेळी तालुकाध्यक्ष सुरेश म्हाऊटकर, वसंत पाटील, अवधूत जानकर, जयसिंग पाटील, राम लाड, काका पाटील, विजय पाटील, भगवान पाटील यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वंचित कर्जमाफीसाठी थेट अधिकाऱ्यांशी संपर्क

शेतकऱ्यांनी महात्मा फुले (सन २०१९) शेतकरी कर्जमाफीचा लाभ मिळाला नसल्याचे निदर्शनास आणून दिले असता खा. शेट्टी यांनी स्थानिक बँक अधिकाऱ्यांना बोलावून घेतले. तसेच सहनिबंधक, आयकर अधिकारी यांच्याशी थेट संवाद साधत वस्तुस्थिती जाणून घेतली. आवश्यक बाबींचा सत्वर पाठपुरावा करून वंचित कर्जमाफीचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याची शेतकऱ्यांना ग्वाही दिली.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT