नगर : तालुक्यात उत्तरेत पाणी, तर दक्षिणेत पाणीबाणी! | पुढारी

नगर : तालुक्यात उत्तरेत पाणी, तर दक्षिणेत पाणीबाणी!

ज्ञानदेव गोरे : वाळकी : नगर तालुक्यातील उत्तर परिसर जोरदार पावसाने तलाव तुडूंब भरलेत, तर दक्षिण परिसरातील तलाव कोरडेठाक आहेत. दक्षिण परिसरातील नागरिक आजही जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. शेतीच्या पाण्यासह पिण्याच्या पाणी टंचाईचे संकट नागरिकांपुढे उभे ठाकले आहे. हलक्या स्वरूपाच्या पावसावर खरिपातील एक दोन पिके हाती लागली असली, तरी रब्बी हंगामाची आशा मावळण्याची शक्यता वाढली आहे. पावसाळ्यातही दक्षिणेतील काही गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतोय. नगर तालुक्यातील उत्तर भागातील जेऊरसह परिसरात जोरदार पावसामुळे पिंपळगाव माळवी तलाव यंदा लवकरच ओव्हर फ्लो झाला. यामुळे परिसरातील भूगर्भातील पाण्याची पातळी वाढली. त्यामुळे परिसरातील शेतीसह पिण्याचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. मात्र, याउलट स्थिती दक्षिण भागात निर्माण झाली आहे. मान्सूनचा पाऊस उशिरा तोही हलक्या स्वरूपात पडल्याने खरिपातील पेरण्या लांबणीवर गेल्या. बाजरी, मूग पिकांनी रिमझिम पावसावर तग धरली; मात्र मका, सोयाबीन, सूर्यफुल, कापूससह चारा पिकांना; मात्र पावसाची गरज भासत आहे. उत्तरेत पावसाचा जोर अन् दक्षिणेत कमजोर असल्याने पाण्याचे उद्भव कोरडे पडले आहेत.

वाळकीचा तलाव रिकामा, गुणवडी, वडगाव, देऊळगाव सिद्धी तलावाने गाठला तळ

वाळकीतील धोंडेवाडी तलाव जूनमध्येच कोरडाठाक पडला आहे, तर देऊळगाव सिद्धी, गुणवडी, वडगाव तांदळी येथील तलावांनी ऐन पावसाळ्यात तळ गाठला आहे. अशीच स्थिती राळेगण, सारोळा कासार, घोसपुरी, अकोळनेर, भोरवाडी, खडकी, खंडाळा, चास, भोयरे पठार, रुईछत्तीशी, आंबीलवाडी येथील तलावांची आहे. हलक्या स्वरुपाचा पाऊस असल्याने दक्षिण भागातील नदी, नाले वाहते झाले नाही. त्यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी खालावली असून, विहिरी, बोअरवेल आदींनी तळ गाठला आहे.

वाळकीसह परिसरातील गावांची शेती पावसावर अवलंबून आहे. पावसाच्या भरवशावरच शेत पिकांचे नियोजन शेतकर्‍यांना करावे लागते. पाऊस आला, तर सुकाळ अन्यथा दुष्काळाची टांगती तलवार कायम असते. वाळकीतील स्थानिक पाणीपुरवठा योजना पाण्याअभावी बंद झाली असून, अन्य गावातील योजनाही आगामी काळात बंद पडणार आहेत. राळेगण म्हसोबा परिसरात पाणीटंचाई वाढली आहे. दक्षिणेतील 18 गावांना पिण्याच्या पाण्यासाठी घोसपुरी पाणी योजनेचा मोठा आधार आहे; मात्र अनेक ग्रामपंचायतींकडे पाणी योजनेची थकबाकी वाढलेली असून, थकबाकी वाढत असल्याने पाणी योजना सुरळीत चालविण्यासाठी घोसपुरी पाणी योजना आर्थिक संकटात सापडली आहे.

पिंपळगाव माळवी तलाव तुडूंब
नगर शहरापासून अवघ्या 15 किलोमीटर अंतरावर असलेला, सातशे एकरांवर पसरलेला पिंपळगाव माळवी तलाव गेल्या अनेक वर्षांनंतर प्रथमच तुडूंब भरलेला आहे. सन 1920 मध्ये नगर शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी हा तलाव बांधण्यात आला होता. तलावाच्या उभारणीस यावर्षी 102 वर्षे पूर्ण झाली आहेत. दोन वर्षांपूर्वी 2020मध्ये तब्बल 10 वर्षांनंतर हा तलाव ओव्हरफ्लो झाला होता.

थकबाकी : पाणीपुरवठा विस्कळीत
दुष्काळी स्थितीत घोसपुरी पाणी योजनेतून नागरिकांची तहान भागविली जाते. मात्र, संकटात आधार देणार्‍या पाणी योजनेची थकबाकी भरण्याकडे ग्रामपंचायत कानाडोळा करत असल्याने थकबाकीपोटी पाणीपुरवठा विस्कळीत होत असतो. अधिकृत नळजोडणीपेक्षा अनधिकृत नळजोडणी प्रत्येक गावात दिसते. यावर ग्रामपंचायत प्रशासन, स्थानिक नेत्यांच्या दबावापुढे झुकत असल्याने कारवाई होत नाही. अधिकृत नळजोडणीधारक पाणीपट्टी भरतात; मात्र अनधिकृतपणे पाणी वापरणार्‍यांमुळे घोसपुरी योजनेची थकबाकी वाढत आहे.

या गावांचे अनुकरण इतरांनी करावे
घोसपुरी योजनेतून तालुक्यातील खंडळा, बाबुर्डी घुमट गावांना घोसपुरीतून पाणी पुरवठा केला जातो. या ग्रामपंचायतींनी नळजोडणीलाच मीटर बसवले असून, जेवढे पाणी घेताले, तेवढे बिल भरावे लागते. यामुळे या गावांमध्ये पाण्याचा अपव्यय होत नाही. ग्रामपंचायतकडून शंभर टक्के पाणीपट्टी ग्राहकांकडून वसूल केली जाते. त्यामुळे या गावांमध्ये पाणीपुरवठ्यात विस्कळीतपणा येतच नाही. घोसपुरी योजनेतून नियमित स्वच्छ पाणीपुरवठा होत असल्याने येथील आरोग्याच्या तक्रारी कमी आहेत. या दोन गावांचे अनुकरण अन्य गावांनी करणे गरजेचे आहे.

Back to top button