पुढारी ऑनलाईन डेस्क : कोल्हापूर जिल्ह्यातील धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम असला तरी पंचगंगेची पाणीपातळी बुधवारी सकाळपासून स्थिर आहे. राजाराम बंधाऱ्याजवळ पाणी पातळी आज (दि.२७) सकाळी ७ वाजता ४०.०५ फुटांवर आहे. तर एकुण ८१ बंधारे पाण्याखालील आहेत.
राधानगरी धरणाचा आज (दि.२७) पहाटे ४.२४ वाजता ३ नंबरचा स्वयंचलित दरवाजा बंद झाला आहे. सध्या एकूण ४ दरवाजे (४,५,६,७) उघडे आहेत. चार दरवाज्यातून ५७१२ क्युसेक आणि पॉवर हाऊसमधून १४०० क्युसेक असा एकुण ७११२ क्युसेक विसर्ग भोगावती नदीपात्रात सुरू आहे.
संपूर्ण जिल्ह्याची तहान भागविणाऱ्या राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या पाच दिवसांपासून मुसळधार कोसळणाऱ्या पावसाने धरण पूर्ण संचय क्षमतेने भरले आहे. मंगळवारी दिवसभर पावसाने थोडीशी उघडीप दिल्याने धरणाची पाणी पातळी स्थिर होती. बुधवारी पहाटे पुन्हा पावसाचा जोर वाढल्याने धरणाचा सहा नंबरचा दरवाजा खुला झाला. त्यानंतर दिवसभरात ५ दरवाजे उघडले होते. त्यातील एक दरवाजा आज सकाळी बंद झाला आहे.
हेही वाचा :