वन्यप्राण्यांच्या हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना 25 लाख; वनमंत्री मुनगंटीवार यांची माहिती | पुढारी

वन्यप्राण्यांच्या हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना 25 लाख; वनमंत्री मुनगंटीवार यांची माहिती

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला सध्या 20 लाख रुपये मदत दिली जाते. त्यात वाढ करून 25 लाख रुपये मदत देण्यासंदर्भात लवकरच निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत बुधवारी दिली. तसेच वन्यप्राण्यांचा हल्ला आणि नुकसानीची मदत 30 दिवसांच्या आत न मिळाल्यास ती व्याजासह देण्यात येण्यासंदर्भातील कायदा दुरुस्ती याच अधिवेशनात करणार, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

पन्हाळा, शाहूवाडी तालुक्यांतील शेतकर्‍यांच्या जंगलानजीक असणार्‍या शेतातील पिकांचे गव्यांकडून नुकसान होत असल्याप्रकरणी आमदार डॉ. विनय कोरे यांनी विधानसभेत लक्षवेधी मांडली होती. त्याला उत्तर देताना मुनगंटीवार यांनी ही माहिती दिली. या लक्षवेधीच्या चर्चेत नाना पटोले, आशिष जयस्वाल यांच्यासह अन्य सदस्यांनी सहभाग घेतला. वन्यप्राण्यांमुळे झालेल्या हानीबाबत नुकसानभरपाईचे विधेयक विधानसभेने संमत केले असून, त्यात 30 दिवसांच्या आत नुकसानभरपाई दिली नाही, तर त्यानंतर व्याज देण्याची तरतूद कायद्यात करण्यात आल्याचेही मुनगंटीवार यांनी सांगितले. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला 20 लाख रुपये मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता ही मदत 25 लाख रुपये करण्याची फाईल तयार आहे. ती फाईल मी लक्षवेधी संपल्यानंतर अर्थमंत्र्यांकडे सादर करणार असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले.

Back to top button