कडगाव; पुढारी वृत्तसेवा: केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या 'सर्वोत्कृष्ट ग्रामीण पर्यटन व्हिलेज' स्पर्धेत पाटगाव (ता. भुदरगड) या गावाने कांस्यपदक मिळविले. त्यामुळे ग्रामीण भागासाठी व राष्ट्रीय स्तरावरील या स्पर्धेत महाराष्ट्रातून एकमेव पाटगावची निवड झाली आहे. या निवडीमुळे जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
भारत मंडपम, प्रगती मैदान येथे पर्यटन मंत्रालयातर्फे पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. नवी दिल्ली येथे झालेल्या कार्यक्रमात केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री अजय भट्ट आणि पर्यटन विभागाच्या सचिव व्ही. विद्यावती यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्कार पर्यटन विभागाच्या पुणे विभागीय उपसंचालक शमा पवार, महात्मा गांधी नॅशनल फेलो संदेश जोशी, पाटगावचे सरपंच विलास देसाई, मधपाळ वसंत वास्कर यांनी स्वीकारला.
शाश्वत विकासाचा पथदर्शी प्रकल्प राबविणार्या पाटगावची सामाजिक, नैसर्गिक, आर्थिक निकषाच्या आधारे या स्पर्धेसाठी निवड झाली होती. देशातील सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांतील 750 हून अधिक गावांमधून केवळ 35 गावांना हा राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार मिळाला आहे. यापैकी 5 गावांना सुवर्ण, 10 गावांना रौप्य तर 20 गावांना कांस्य पदक मिळाले आहे.
युनायटेड नेशन्स वर्ल्ड टुरिझम ऑर्गनायझेशन, युनायटेड नेशन्स एनव्हायर्नमेंट प्रोग्राम, जी-20, केंद्रीय पर्यटन मंत्रालय आणि केंद्रीय वन मंत्रालय यांच्या सहकार्याने या गावांचा वर्षभर विकास केला जाईल. भारतीय ग्रामीण पर्यटन संस्था ही देशातील या ३५ गावांचा विकास करणारी राष्ट्रीय स्तरावरील संस्था आहे.
पाटगाव हे 'मधाचं गाव' म्हणून ओळखले जात आहे. पाटगाव परिसरात शेकडो मधपाळ शुद्ध मध संकलन करण्याचा व्यवसाय गेल्या अनेक वर्षांपासून करतात. कोणतेही भेसळ नसलेला येथील मध 'औषधी मध' म्हणून संपूर्ण देशभर प्रसिद्ध आहे. दरवर्षी पाच ते सात टनापर्यंत मध निर्मिती या परिसरात करण्यात येते. यामुळेच या भागातील शेतकर्यांची ओळख राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर आता पाटगावच म्हणजे मधाचे गाव म्हणून गेल्या काही दिवसांपासून ओळख होत आहे.आमदार प्रकाश आबिटकर यांनी सुरुवातीपासूनच येथील मध विक्री आणि मध पर्यटनातून स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी या उपक्रमाला प्रोत्साहन दिले आहे.