पाटगाव होणार ‘मधाचे गाव’ | पुढारी

पाटगाव होणार ‘मधाचे गाव’

कोल्हापूर ; अनिल देशमुख : भुदरगड तालुक्यातील पाटगाव ‘मधाचे गाव’ होणार आहे. या गावात होणार्‍या मधाचे ब्रँडिंगही केले जाणार असून, त्यासाठी जीआय मानांकन घेतले जाणार आहे. त्याबाबतचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. खादी ग्रामोद्योग मंडळाच्या मदतीने पाटगावसह जिल्ह्यातील अन्य चार गावांचाही मधाच्या गावासाठी विचार सुरू आहे.

पाटगाव परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून मधाचा व्यवसाय केला जात आहे. त्यासाठी 170 जणांची नोंदणी आहे. मात्र, या मधाचे ब्रँडिंग झालेले नाही. जिल्ह्यात ‘हनी कलेक्शन’ सेंटरही नाही. त्यामुळे उत्पादकांना चारशे-पाचशे रुपयांना प्रतिकिलो मध विकावा लागतो. हाच मध पुढे आठशे ते हजार रुपये किलोने विकला जातो. परिणामी उत्पादक शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होत आहे. पाटगाव येेथील मधासाठी जीआय मानांकनही घेण्यात येणार आहे. तो ‘पाटगाव मध ’अथवा ‘सह्याद्री मध’ या नावाने ओळखला जावा यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे महात्मा गांधी नॅशनल फेलो संदेश जोशी यांनी सांगितले.

हनी बी ब्रीड सेंटर उभारणार

पश्‍चिम घाटात आढळणार्‍या ‘सातेरी’ (एपिस सेेरेना इंडिका) या भारतीय प्रजातीच्या मधमाशीचा तुटवडा आहे. यामुळे मधासाठी प्रशिक्षण घेऊनही पेट्या मिळत नाहीत. यामुळे मधाच्या गावात ‘हनी बी ब्रीड’ सेंटर उभारले जाणार आहे. त्यातून मधमाश्यांची आणि परिणामी पेट्यांची संख्या वाढेल, त्यातून मधाचे उत्पादनही वाढणार आहे.

हनी कलेक्शन सेंटरही सुरू करणार

या उपक्रमांतर्गत हनी कलेक्शन सेंटरही सुरू केले जाणार आहे. सध्या महाबळेश्‍वर येथे असे सेंटर आहे. जिल्ह्यात कलेक्शन सेंटर सुरू झाल्यानंतर मध उत्पादक शेतकर्‍यांना चांगला दर मिळण्यास मदत होणार आहे.

मधाला मागणी वाढली

औषधी गुणधर्म असल्याने कोरोना काळानंतर मधाच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. एका पेटीतून एका वर्षाला सुमारे सात ते दहा किलो मध मिळतो, त्यातून शेतकर्‍याला एका पेटीमागे सात ते दहा हजार रुपये मिळू शकतील.

Back to top button