कागल : पुढारी वृत्तसेवा शेतकर्यांसाठी नावीन्यपूर्ण संकल्पना मांडण्याचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी राजर्षी शाहू कृषी प्रदर्शनाचे आयोजन केल्याचे शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपाचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी सांगितले. येथे राजे फाउंडेशन, शाहू ग्रुप व तिरुमला ऑइल यांच्या संयुक्त विद्यमाने राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी वर्षानिमित्त आयोजित राजर्षी शाहू कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी 'स्टार्टअप कोल्हापूर' संकल्पनेचे अनावरण झाले. विक्रमसिंह घाटगे अॅकॅडमी व राजमाता जिजाऊ महिला समिती संचलित सुवर्ण सुगरण ब्रँडचे उद्घाटनही झाले. यावेळी महाराष्ट्र केसरी पै. पृथ्वीराज पाटील याला शाहू ग्रुपमार्फत पन्नास हजार रुपये रोख बक्षीस देऊन गौरव केला. तसेच दिव्यांग पॉवरलिफ्टर शुक्ला बिडकर यांचाही सत्कार केला. छत्रपती संभाजी महाराज यांच्या कागलमध्ये सकल मराठा समाजाच्या वतीने उभारण्यात येणार्या पुतळ्यासाठी 2 लाख 80 हजार रुपयांची देणगी घाटगे यांच्या हस्ते देण्यात आली. या प्रदर्शनात दीडशेहून अधिक स्टॉल लावले आहेत. जातिवंत जनावरे, दीड टन वजनाचा रेडा हे खास आकर्षण आहे.
घाटगे म्हणाले, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानमध्ये तोफा वितळवून शेतकर्यांसाठी नांगर तयार करून आधुनिकीकरणाचा पाया घातला. हाच वारसा शाहू ग्रुपच्या माध्यमातून स्व. विक्रमसिंह घाटगे यांनी चालविला. त्यांचाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून या कृषी प्रदर्शन भरविले. शेतकर्यांचा उत्पादन खर्च कमी होऊन उत्पादन वाढीसाठी नावीन्यपूर्ण संकल्पना मांडाव्यात.
त्यापैकी टॉप दहा संकल्पनांना शाहू ग्रुप सर्व प्रकारचे पाठबळ देईल. राजमाता जिजाऊ महिला समितीच्या कार्याध्यक्षा सौ. नवोदिता घाटगे, शाहूचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे, ज्येष्ठ संचालक वीरकुमार पाटील, कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण, राजे बँकेचे चेअरमन एम. पी. पाटील आदी उपस्थित होते.यावेळी तिरूमला ऑइल्सचे मॅनेजर संदीप पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. स्वागत दीपक मगर यांनी केले. आभार दिगंबर अस्वले यांनी मानले.