कोगनोळी ; पुढारी वृत्तसेवा आज (सोमवार) पासून बेळगाव येथे हिवाळी अधिवेशनाला सुरूवात झाली. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीनेही दरवर्षीप्रमाणे महामेळाव्याचे आयोजन केले होते. या महामेळाव्याला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे नेते बेळगावला जात होते. दरम्यान कर्नाटक पोलिसांनी दडपशाहीच्या मार्गाने महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या नेत्यांना दूधगंगा नदीवरील पुलावर रोखले. यावेळी कर्नाटक पोलिसांकडून सौम्य लाठीमारही करण्यात आला. यावेळी महाराष्ट्रातील नेते आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. त्यामुळे दूधगंगा नदीवर तब्बल दीड तास चक्काजाम झाला होता. संपूर्ण परिसराला पोलिस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. महाराष्ट्रातील नेतेमंडळींनी कर्नाटक प्रशासनाच्या धिक्काराच्या घोषणा देत निषेध नोंदवला. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेत काही वेळानंतर त्यांची सुटका केली. यावेळी पोलिसांनी नेत्यांना पुन्हा महाराष्ट्रामध्ये पाठवून दिले.
आज (दि.१९ ) सकाळी माजी मंत्री हसन मुश्रीफ, कोल्हापूर जिल्हा शिवसेनाप्रमुख विजय देवणे, जिल्हा बँकेचे संचालक भैय्या उर्फ प्रताप माने, माजी उपनगराध्यक्ष सुनील माळी, माजी महापौर सचिन चव्हाण यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते कर्नाटकात प्रवेश करण्यासाठी व महामेळाव्याला पाठिंबा देण्यासाठी दूधगंगा नदीकडे येत होते.
महाराष्ट्रातील नेत्यांना कर्नाटकात येण्यासाठी सीमाबंदी आदेश कर्नाटक प्रशासनाने लागू केला आहे. महाराष्ट्रातील नेत्यांना प्रवेश बंदी केल्यामुळे कर्नाटक पोलिसांतर्फे राज्य राखीव दल, सशस्त्र दल यांच्यासह शेकडो पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. कर्नाटक पोलिसांतर्फे एक जिल्हा पोलिस प्रमुख, तीन डीएसपी, पाच सीपीआय, 10 पीएसआय, आठ कर्नाटका स्टेट रिझर्व पोलिस वाहने आणि पोलिस, होमगार्ड तैनात केले आहेत. त्यामुळे संपूर्ण नदी परिसराला कर्नाटक-महाराष्ट्र पोलिसांमुळे छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते.
महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना व अन्य आघाडीतील नेतेमंडळी, कार्यकर्ते हातामध्ये पक्षाचे ध्वज घेऊन दूधगंगा नदीवर हजर झाले होते. या वेळी बिदर, भालकी, निपाणी, बेळगाव महाराष्ट्रात समाविष्ट झालेच पाहिजे, मराठी बांधवांवरील अन्याय खपवून घेणार नाही, पोलिसांच्या हुकूमशाहीचा व कर्नाटक प्रशासनाचा धिक्कार असो, अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला. पोलिसांनी सौम्य लाठीमारही केल्याने वातावरण थोडावेळ तणावपूर्ण बनले होते. महाराष्ट्रातील नेतेमंडळींनी कर्नाटक शासनाच्या या प्रकाराचा निषेध व्यक्त केला. यावेळी नेतेमंडळी व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणाऱ्या वाहनांना एकेरी मार्गावरून सोडले जात होते. त्यामुळे वाहतुकीची कोंडी निर्माण झाली. सुमारे दीड कि. मी. अंतरापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. अनेक विद्यार्थी, शेतकरी, ट्रॅक्टर चालक, ऊस वाहतूकदार, दुचाकीस्वार यांच्यासह वाहनधारकांची गैरसोय झाली.
कर्नाटक-महाराष्ट्र सीमाप्रश्न सध्या सीमाभागात तणावपूर्ण वातावरण आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महामेळाव्याला महाराष्ट्रातील नेत्यांना उपस्थित राहण्यासाठी प्रशासनाने बंदी आदेश लागू केला आहे. त्यात महाराष्ट्रातील नेत्यांकडून मेळाव्याला उपस्थिती लावणार असल्याचे सांगण्यात आले होते. त्या पार्श्वभूमीवर कर्नाटक पोलिसांकडून सीमाभागामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. दोन राज्यातील राजकीय वातावरण तापल्याने पोलिसांना सीमेवर कडक पहारा द्यावा लागत आहे.
हेही वाचा :