सोलापूर : माघ पौर्णिमेदिवशी स्नानाचे खूप महत्त्व सांगितले आहे. प्रत्येक नदी ही गंगेसमान मानली जाते. आपल्या गावामध्ये असलेली कुठलीही नदी गंगा स्नानाचे फळ प्राप्त करून देते. हा सांगणारा दिवस म्हणजे माघी पौर्णिमा होय. पाण्याचे जतन म्हणजेच गंगा पूजन आहे. देवी गंगेची आराधना हे प्रत्येकाने केलीच पाहिजे. पाणी म्हणजे जीवन आहे. हे सांगणारा दिवस म्हणजे ही माघी पौर्णिमा आहे, असे आपण मानणे गरजेचे आहे. शास्त्रकारांनी या दिवशी सर्वच देव नदीमध्ये स्नानाला येतात. म्हणून आपणही नदीत स्नान केले पाहिजे, असा प्रघात घालून दिला आहे. Magh Purnima 2024
माघी पौर्णिमा कुलधर्माची पौर्णिमा म्हणूनही गणली गेली आहे. महाराष्ट्रात माघी पौर्णिमा खूप उत्साहामध्ये साजरी केली जाते. महाराष्ट्रातच नव्हे तर भारतातही अनेक ठिकाणी ही पौर्णिमा मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. ही पौर्णिमा कुलधर्माची पौर्णिमा म्हणूनही गणली गेली आहे. आलेले नवीन धान्य प्रथमतः देवाला अर्पण करून मगच, ते आपण ग्रहण करण्याची सुंदर पद्धत महाराष्ट्रातच नव्हे, तर भारतीय संस्कृतीमध्ये रूढ आहे. नव्याची पौर्णिमा म्हणजेच माघी पौर्णिमा. या माघ महिन्यांमध्ये पौर्णिमेच्या, मागे पुढे मघा हे नक्षत्र येते, म्हणून ज्योतिष शास्त्राप्रमाणे या महिन्याला माघ मास नाव प्राप्त झाले आहे. या महिन्यांमध्ये अनेक पुण्य प्रधान अशा गोष्टी सांगितलेल्या आहेत. स्नान, दान, यज्ञ, याग, विष्णूची पूजा, शंकराची पूजा, पार्वतीची पूजा, आणि मुख्य म्हणजे गंगेची पूजा यामध्ये मुख्यतः सांगितलेली आहे. Magh Purnima 2024
हा महिना शेतकरी वर्गासाठी खूपच पुण्याचा महिना आणि सुखाचा महिना मानला गेला आहे. कारण प्रत्येक शेतकर्याच्या घरी नवीन धान्य उंबरठा ओलांडून सुख समृद्धी घेऊन येत असते. आपला देश हा कृषिप्रधान देश असल्यामुळे आपले सण- वार- उत्सव सुद्धा शेतीवरच अवलंबून आहेत. ज्यावेळी शेतामध्ये किंवा येथील निसर्गामध्ये बदल होतील, त्यावेळी हे उत्सव साजरे करण्याची प्रथा अविरत आजपर्यंत चालू आहे.
कृषिप्रधान असलेल्या आपल्या देशांमध्ये शेतात आलेले धान्य हे लक्ष्मी स्वरूपातच मानले जाते. धान्य म्हणजे आपली कष्टाची कमाई आहे. शेतामध्ये राबल्याशिवाय आपल्या हातात काहीच लागत नाही आणि म्हणूनच त्या देवतेची किंवा त्याचे धान्य पुजण्याची प्रथा आपल्या देशामध्ये आहे व ती सर्वश्रेष्ठ आहे. ही प्रथा प्रत्येक शेतकर्याच्या घरी आज पाहिला मिळते. ज्यावेळी शेतकरी या देवतेला नवीन धान्याचा नैवेद्य अर्पण करेल. त्यानंतर सर्वच शेतकरी वर्ग हे अन्नग्रहण करत असतो. शेतकरी राजा या दिवसाची खूप आतुरतेने वाट पाहत असतो.
शेतकरीराजा या दिवशी नवीन ज्वारीची पाच ताटे घरी आणतात. त्यांच्या टोकाला गाठ मारतात. गव्हाच्या पाच मुठीएवढ्या पेंढ्या तेथे ठेवल्या जातात. या ताटात कणकेचे पाच दिवे करून लावतात. व त्यांची पूजा केली जाते. त्याशिवाय नवीन आलेले धान्य खायचे नाही, अशी श्रद्धा आहे. काही ठिकाणी धान्याची एक पेंढी रानातच एका मेढीला बांधून ठेवतात. त्या मेढीची पूजा करून तिला धान्याचे पाच दाणे आणि नव्या धान्याचा नैवेद्य दाखवितात. काही शेतकरी धान्याचे खळे करताना खळ्याच्या मध्यभागी पेंढी पुजतात व मगच खळे करण्यास प्रारंभ करतात.
माघी पौर्णिमेला सूर्य तापत चाललेला असतो, परंतु पौर्णिमा ही चंद्राची असल्यामुळे चंद्राची शीतलता आपल्या शेताला खुणावते आणि शेताची ऊब वाढविते. चंद्र हा मनाचा कारक आहे. आणि मनाला समृद्धी देणारी लक्ष्मी ही धनाची आणि धान्याची देवता आहे. धान्याच्या देवतेचे स्वागत, हे आपला चंद्र म्हणजेच मन प्रसन्न असल्यावर केल्याने आपली खूपच भरभराट होते, अशी धार्मिक श्रद्धा आहे. त्याबरोबरच या दिवशी विष्णूची ही पूजा करतात. जेव्हा भगवान विष्णूंनी मोहिनी रूप धारण केले, त्यानंतर काही वर्षांनी शंकरांना हे रूप पाहण्याची इच्छा झाली. त्यावेळी भगवान विष्णूंनी शंकरांच्या इच्छेसाठी पुन्हा मोहिनी रूप धारण केले.
परंतु, ते रूप शंकरांना इतके भावले की, ते त्यांना सोडेनातच. त्यामुळे भगवान विष्णूनीं हे रूप देवी पार्वतीच्या स्वरूपामध्ये समाविष्ट केले. हे पार्वतीचे रूप म्हणजे देवी म्हाळसा होय. हे रूप पाहून भगवान शंकरांना खूप आनंद झाला. पुढे म्हाळसा देवीचा विवाह शंकर म्हणजेच खंडेराया सोबत झाला, त्याची आठवण म्हणूनही हा दिवस साजरा केला जातो.
या दिवशी स्नानाचे खूप महत्त्व सांगितले जाते. प्रत्येक नदी ही गंगेसमान मानली जाते. आपल्या गावामध्ये असलेली कुठलीही नदी गंगा स्नानाचे फळ प्राप्त करून देते. हा सांगणारा दिवस म्हणजे माघी पौर्णिमा होय. पाण्याचे जतन म्हणजेच गंगा पूजन आहे. देवी गंगेची आराधना हे प्रत्येकाने केलीच पाहिजे. पाणी म्हणजे जीवन आहे. हे सांगणारा दिवस म्हणजे ही माघी पौर्णिमा आहे, असे आपण मानणे गरजेचे आहे. शास्त्रकारांनी या दिवशी सर्वच देव नदीमध्ये स्नानाला येतात. म्हणून आपणही त्या नदीचे स्नान केले पाहिजे असा प्रघात घालून दिला आहे. इथून पुढे सूर्य प्रखर होत जात असतो. पृथ्वीवरील पाण्याचा अंश कमी कमी होत जात असतो. त्याचे योग्य जतन केले पाहिजे. हा संदेश घेऊन येणारी ही पौर्णिमा आहे.
हेही वाचा