पंढरपूर : माघी यात्रा दर्शन रांगेत लाखावर भाविक | पुढारी

पंढरपूर : माघी यात्रा दर्शन रांगेत लाखावर भाविक

पंढरपूर; पुढारी वृत्तसेवा : माघ एकादशीचा मुख्य सोहळा मंगळवारी (20 फेब्रुवारी) साजरा होत आहे. या सोहळ्यासाठी राज्याच्या कानाकोपर्‍यातून भाविक पंढरीत दाखल होत आहे. रविवारी दुपारनंतर दर्शन रांग मंदिरारपासून पुढे सारडा भवन व पुढे पत्राशेड येथील सातव्या दर्शन शेडमध्ये दाखल झाली होती. या दर्शन रांगेत लाखावर भाविक आहेत. मंदिर परिसर, चंद्रभागा वाळवंट व शहर परिसर भाविकांमुळे फुलला आहे. पंढरीत दोन लाखांवर भाविक दाखल झाले आहेत.

यात्रेला किमान 5 ते 6 लाख भाविक येतील, असा प्रशासनाचा अंदाज आहे. त्यानुसार मंदिर समितीने भाविकांना सुलभ व जलद दर्शन उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना राबविल्या आहे. विशेषत: उन्हाचा चटका भाविकांना लागू नये म्हणून दर्शन रांगेत मंडप उभारून सावली तयार करण्यात आली आहे. वाटरप्रुफ दर्शन रांग उभारण्यात आल्याने ऊन, वारा, पाऊस यापासून भाविकांचे रक्षण होणार आहे. यंदा दर्शन रांगेतील घुसखोरी रोखण्यावर भर दिला आहे. त्याचबरोबर चांगली स्वच्छता व्यवस्था ठेवण्यात येत आहे. यंदा माघ यात्रेत प्रथमच दर्शन रांगेतील भाविकांना अन्नदान करण्यात येत आहे. त्याचबरोबर आरोग्य व्यवस्थादेखील उपलब्ध करण्यात आली आहे. पत्राशेड येथे या अन्नछत्राचा प्रारंभ सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी सदस्य शकुंतला नडगिरे, ह.भ.प. ज्ञानेश्वर देशमुख जळगावकर, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, बलभीम पावले उपस्थित होते.

Back to top button