पुढारी ऑनलाईन डेस्क : आशिया कप (Asia Cup) स्पर्धेत पाकिस्तानविरुद्धच्या (IND vs PAK) पहिल्या सामन्यापूर्वी टीम इंडियासमोर एक नवी समस्या निर्माण झाली आहे. भारतीय संघात (Team India) पुनरागमन करणारा केएल राहुल (KL Rahul) पाकविरुद्धचा पहिला सामना खेळू शकणार नसल्याचे समजते आहे.
बीसीसीआयच्या (BCCI) निवड समितीने सोमवारी टीम इंडियाच्या 17 जणांचा चमू जाहीर केला. यात दुखापतींमुळे अनेक महिने संघाबाहेर असणा-या श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) आणि केएल राहुल (KL Rahul) यांना संधी देण्यात आली. पण आता राहुल (KL Rahul) पहिल्या सामन्यात खेळेल की नाही यावर गोंधळ निर्माण झाला आहे.
भारतीय संघाचे चीफ सिलेक्टर अजित आगरकर (Ajit Agarkar) आणि कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) यांनी आशिया कप स्पर्धेसाठी संघाची घोषणा करताना मोठा खुलासा केला. आगरकर यांनी सांगितले की, राहुल त्याच्या जुन्या दुखापतीतून सावरला आहे. पण या खेळाडूला नुकतीच किरकोळ दुखापत झाली आहे. हा खेळाडू पाकिस्तानविरुद्ध पहिल्या सामन्यात खेळू शकणार नाही आणि त्यामुळे संजू सॅमसनचा बॅकअप यष्टिरक्षक म्हणून संघात समावेश करण्यात आला आहे. पण आशिया कपदरम्यानच दुसऱ्या किंवा तिसऱ्या सामन्यापूर्वी राहुल फिट होईल, असेही स्पष्ट करण्यात आले.
आगरकर यांनी संघ जाहीर करताना एक आनंदाची बातमीही दिली. श्रेयस अय्यर आशिया कपमधील प्रत्येक सामना खेळण्यासाठी पूर्णपणे तंदुरुस्त असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, राहुल खेळत नसेल तर संजू सॅमसन आणि इशान किशन यांच्यापैकी कोणताही खेळाडू खेळताना दिसेल. तिलक वर्मा आणि सूर्यकुमार यादव या खेळाडूंचाही भारताच्या मधल्या फळीत समावेश करण्यात आला आहे.
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, इशान किशन, हार्दिक पंड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज. कुलदीप यादव आणि प्रसिद्ध कृष्णा.
बॅकअप प्लेयर : संजू सॅमसन